घरफोडी करणारी टोळी गजाआड; नारायणगाव पोलिसांची कामगिरी

नारायणगाव,दि.३० (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील डिंबळेमळा शिवारातील गजानन आपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या माजी पंचायत समिती सदस्या अर्चना आशिष माळवदकर यांच्या राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून व भर दिवसा घरफोडी करून २२ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात नारायणगाव पोलिसांना यश आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व चोरी करताना वापरलेली स्विफ्ट कारचा शोध लावून पोलीस धुळे जिल्ह्यात पोहोचले. त्यानंतर पुढील तपासात आरोपी महेंद्र ज्ञानेश्वर बोरसे (वय-३२), आकाश सुभाष निकम (वय-२४) दोघेही राहणार नांद्रा ता. पाचोरा जि. जळगाव व अमोल सुरेश चव्हाण (वय २८) राहणार सामनेर ता.पाचोरा यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरी केलेल्या माला पैकी पाच तोळे सोने व तीन घड्याळे असा एकूण तीन लाखाचा माल पोलिसांनी हस्तगत केला.

 

या तपासात गुन्हा उघड करण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश घट्टे, जुन्नर चे पोलीस उपविभागीय अधिकारी रवींद्र चौधर, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे, सावंत, हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, मंगेश लोखंडे, मोमीन, अविनाश वैद्य, गोविंद केंद्रे, अक्षय नवले, महेश काठमोरे, शैलेश वाघमारे, कोतकर, दत्तात्रय ढेंबरे, मेहकर यांनी मदत केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील धनवे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *