झेप पुनर्वसन केंद्राचे 15 वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पिंपरी येथील झेप पुनर्वसन केंद्र या विशेष मुलांच्या संस्थेचे 15 वे वार्षिक स्नेहसंमेलन ‘मैत्री’ या विषयावर आधारित विविध सादरीकरणांतून सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडले.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त शेखर सिंग, पद्मश्री गिरीश प्रभुणे, संस्थेच्या संस्थापिका नेत्राताई पाटकर, माजी शासकीय सेवाधिकारी नंदकुमार फुले, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, सिटीप्राईड शाळेच्या प्राचार्या अश्विनी कुलकर्णी, उद्योजक रवि नामदे आदी उपस्थित होते.

संस्थेच्या संस्थापिका नेत्राताई पाटकर यांच्या प्रास्ताविकाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. मुलांनी विविध स्तरातील मैत्रीचे स्वरूप दाखविण्याचा प्रयत्न केला. मैत्री ही फक्त मित्र-मैत्रिणींचेच नव्हे तर ती शाळेशी, निसर्गाशी, प्राण्यांशी देवाशी तसेच ती वडील आणि मुलीची सुद्धा असते हे दाखवले. मैत्री या विषयावर नृत्य- गायन- वादन तसेच पोवाडा अशा वेगवेगळ्या सादरीकरणांत जवळपास 120 मुले सहभागी झाली होती. तर, काही पालकांनी उत्स्फूर्तपणे मनोगत व्यक्त करत आपले संस्थेसोबतचे अनुभव सांगितले.

पोवाडा, मुलांचा सर्वतोपरी सहभाग असणारा सांगितिक मेजवानीचा ऑर्केस्ट्रा अशा सर्वच कार्यक्रमांना पाहुण्यांनी दाद दिली. आयुक्त शेखर सिंग यांनी “22 डिसॅबलिटिज् ना समाविष्ट करुन झेपसोबत डिसॅबिलिटी सेंटर सुरु करुन बालवडी केंद्रात early intervention करुन मुलांना वेळेत थेरपी उपलब्ध करु” असे सांगितले. नंदकुमार फुले यांनी 18 वर्षांवरील मुलांच्या कायदेशीर पालकत्वाविषयी व कायदेशीर इतर तरतुदींविषयी मार्गदर्शन केले. पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी “उत्तम कारागिराच्या हातून सुंदर शिल्प जसे तयार होते, तसे झेप म्हणजे या मुलांसाठी एक सुंदर नंदनवनात तयार व्हावे असे म्हणत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने वर्षभरात केलेल्या काही विशेष प्रगतीबद्दल 11 मुलांचे व क्रीडा स्पर्धेतील 12 विजेत्यांचे पाहुण्यांच्या हस्ते विशेष पारितोषिक देऊन कौतुकही करण्यात आले. प्रमुख अतिथी, पालक, मुले, शिक्षक, तसेच संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष वर्षा तावडे, सचिव सीमा कांबळे, समीर गाजरे, भूषण जोशी तसेच सर्व हितचिंतकांनी कार्यक्रमाला प्रचंड संख्येत उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.संपूर्ण कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी क्रांती ठाकूर यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *