केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट…कर्जत- जामखेड मतदारसंघाच्या आर्थिक सुबत्तेबाबत केली चर्चा…

पुणे
अतुल परदेशी मुख्य संपादक

ता. १४ : कर्जत-जामखेडच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवानेते आमदार रोहित पवार नेहमीच कार्यरत आहेत. मतदारसंघातील नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करण्यासाठी केंद्र, राज्य पातळीवर तत्परतेने पाठपुरावा करून ते प्रगतीचा नवा आयाम स्थापित करत आहेतच शिवाय मतदारसंघातील पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात निर्माण आणि नुतनीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून घेत आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी (ता. १४) भेट घेऊन कर्जत आणि जामखेड तालुक्यांमधील आर्थिक विकासाच्या दृष्टीने धोरणात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा केली. कोरोना महामारीच्या काळात सर्वाधिक प्रभाव हा असंघटीत क्षेत्रातील महिला आणि कामगारांवर पडला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा ग्रामीण भागातील गरिबीचा सापळा तोडण्यात यशस्वी सिद्ध झाला आहे, यामुळे ग्रामीण दैनंदिन मजुरी करणाऱ्या कामगारांचे राहणीमान सुधारले आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्ती वाढल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणे, लिंग समानता सुधारणे, स्थानिक राजकारणात सहभाग वाढवणे, सार्वजनिक संपत्ती वाढवण्यास मदत झाली आहे. याच धर्तीवर शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व्यापक आणि खात्रीशीर रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि त्यांच्यासाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम सुरू करावा यासाठी आमदार रोहित यांनी निर्मला सीतारामन यांची भेट घेतली.


सोबतच मतदारसंघात आर्थिक व्यवहारांसाठी बँकांची असलेली संख्या कमी आहे त्यामुळे नागरिकांना दैनंदिन व्यवहारांमध्ये काही समस्यांना तोंड द्यावे लागते. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात शासनाच्या मदतीने सावकारकीला आला घालण्याचा प्रयत्न केला जातोय. या परिस्थितीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार याठिकाणी अधिक प्रमाणात वाढावे आणि येथील स्थानिक नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक यांना संघटीत बँकिंग व्यवस्थेच्या मदतीने अर्थसहाय्य मिळावे यासाठी रोहित पवार प्रयत्नशील आहेत. केंद्राच्या अखत्यारीत असणारा हा विषय मार्गी लावण्यासाठी आ. रोहित पवार यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन विनंती केली.

शहरी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी राष्ट्रीय शहरी रोजगार हमी कार्यक्रम राबविण्याबाबत आणि कर्जत- जामखेडमध्ये इतर आर्थिक घडामोडी आणि राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकाधिक व्यवहार वाढण्यासाठी नवीन बँकाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन यावेळी निर्मला सीतारामन यांनी दिल्याचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार दिल्लीमध्ये असता केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची भेट घेऊन राष्ट्रीय वयोश्री योजनेत- RVY अहमदनगर जिल्हा समाविष्ट करण्यासाठी निवेदन दिले. RVY ही देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी भौतिक सहाय्य आणि सहाय्यक-जीवन उपकरणे पुरवण्यासाठी एक केंद्रीय क्षेत्र योजना आहे. ही योजना दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात आली आहे. ज्याचा उपयोग येथील नागरिकांना होईल. अहमदनगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा जिल्हा असताना देखील समाविष्टीत नसल्याने करण्यात आले नसल्याने याचा समावेश करण्यात यावा अशी विनंती केली जेणेकरून जिल्ह्याला आणि पर्यायाने कर्जत आणि जामखेडला याचा फायदा होईल.

तसेच केंद्रीय अल्पसंख्याक कार्य मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांची आमदार रोहित पवार यांनी भेट घेऊन USTTAD च्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यांचा समावेश करण्याची विनंती नकवी यांना आ. रोहित पवार यांनी निवेदनाद्वारे केली. याचसोबत अल्पसंख्याकांच्या इतर योजनांची अहमदनगर जिल्हा आणि कर्जत – जामखेडमध्ये प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी विनंती केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *