रांजणगाव विद्याधाम हाय स्कूलच्या १९९६-९७ बॅचच्या स्नेहसंमेलनात गुरुजनांसह तेव्हाचे विद्यार्थी २६ वर्षांनी आले एकत्र

विभागीय संपादक रवींद्र खुडे
रांजणगाव : दि. २ मार्च २०२३

 

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या अष्टविनायक गणपतीपैकी एक असलेले श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती येथील, श्री मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेच्या ई. १० वी च्या १९९६-९७ बॅचचे स्नेहसंमेलन, रांजणगाव येथील सुखकर्ता लॉन्स येथे रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी पार पडले. तब्बल २६ वर्षांनी सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असल्याचे व जुन्या शालेय आठवणी जागृत झाल्याचे दिसत होते. प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात जरी आता रमला असला, तरी सर्वचजण बालपणीच्या निरागस आठवणीत डूबून गेल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे या सर्वांना शिकविणारे शिक्षक जरी वयाने थकले होते, तरी देखील विद्यार्थ्यांच्या प्रेमापोटी सर्वजण दूरदूरहून येऊन विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी झालेले होते.
अशा चांगल्या कार्यक्रमांतून व जुन्या आठवणींतून एक प्रकारची ऊर्जा मिळते व आणखी जगण्याची उर्मी येत असल्याच्या भावना आपल्या मनोगतातून अनेकांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर सर्व शिक्षकांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.

 


शाळेची सुरुवात ज्या परिपाठाने होत असते, तो परिपाठ १९९६-९७ बॅच च्या विद्यार्थ्यांनी पुन्हा अनुभवला. त्यात राष्ट्रगीत, सुविचार, दिनविशेष, प्रार्थना, सुचना, आदी जसेच्या तसे केले गेले. त्यानंतर इशस्तवन, स्वागतगीत या वयातही सुंदर पद्धतीने माजी विद्यार्थ्यांनी केले.
या स्नेहसंमेलनात उपस्थित असणाऱ्या व आज विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना शिक्षकांना अभिमान वाटत असल्याचे भाव, त्यांच्या चेहऱ्यावर प्रकर्षाने जाणवत होते आणि त्याच भावना शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मनोगतातून व्यक्त होत होत्या. त्यामुळे सर्व वातावरण एका भावनिक क्षणांच्या जुन्या आठवणींत रमलेले होते.
२६ वर्षांपूर्वी जे जे विद्यार्थीदशेत होते, तेच विद्यार्थी आज देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक बनून व विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवून आपापल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडत असल्याने, या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांच्या चेहऱ्यांवर समाधान दिसत होते.
शिक्षक वृंदांमध्ये तुकाराम फंड, मारुती घुगे, जयंत जोशी, शिवाजी पवार, आनंदा वेताळ, भुजबळ, अनारसे व उबाळे सर, तसेच श्रीमती सुमन चोरे, सुनंदा भोगावडे, घुगे मॅडम उपस्थित होत्या.
आज सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक, वैज्ञानिक, वाणिज्जिक, कला, क्रीडा, शासकीय, अशा विविध क्षेत्रात काम करत असणाऱ्या १९९६-९७ च्या ई. १० वी च्या बॅचमधील अनेक विद्यार्थी आता विविध पदावर आहेत. त्यात आदर्श शिक्षिका राधा बांदल व सुरेखा शेलार, ललिता दुंडे (ग्रा. पं. सदस्या, निमगाव म्हाळुंगी), सुरेखा खेडकर (ग्रा. पं. सदस्या इंदोरी), नेहा फंड (संगीत विशारद), ताई कुटे, तारका माकर, मनीषा लांडे, मीनाक्षी पाचुंदकर, वैशाली पाचुंदकर, अनिता लांडे, योगिनी लांडे, लीला पाचुंदकर (अंगणवाडी सेविका) व कल्पना खेडकर आदी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
तसेच माऊली पाचुंदकर (राजमुद्रा ग्रुप), विक्रम पाचुंदकर (पंचायत समिती सदस्य), उद्योजक नेताजी फंड, उद्योजक संपत भुजबळ, माजी सैनिक महादेव खेडकर (माजी सैनिक त्रिदल संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष), संतोष पवार (मोरया ट्रान्सपोर्ट), सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण शेळके व संदीप देवकर, उद्योजक राजेंद्र चिखले, बंडू पाचुंदकर व विकास अभंग (अध्यक्ष, शिरूर तालुका परीट धोबी समाज) असे एकूण ऐंशी विद्यार्थी व बारा शिक्षक सहभागी झालेले होते.
दिवसभर चाललेल्या या स्नेह संमेलनात सकाळी चहानाष्टा, मिष्टान्न भोजन ते संध्याकाळी चहानाष्ट्यापर्यंत एकत्र आणाऱ्या बालपणीच्या वर्गमित्र व गुरुजनांना निरोप देताना सर्वांनाच गहिवरून आलेले होते.
यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना एक स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. तसेच आर्थिक परिस्थितीने हतबल असणाऱ्या मित्रांना मदतीचे हातही पुढे आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट इंगवले यांनी केले तर आभार राजू चिखले यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *