सतराव्या कामगार साहित्य संमेलनात रंगले अभिरूप न्यायालय

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २७ फेब्रुवारी २०२३

पद्मश्री पोपटराव पवार आमचा देव हाय !

 

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या १७ व्या कामगार साहित्य संमेलनात पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेच्या वतीने मिरज येथे अभिरूप न्यायालय सादर करण्यात आले. आरोपी म्हणून चक्क पद्मश्री पोपटराव पवार यांना उभे करण्यात आले. हुबेहूब कोर्ट उभे केले गेले. या अभिरूप न्यायालयाला मिरजेला आलेल्या सर्व साहित्य रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कामगार भूषण पुरुषोत्तम सदाफुले यांच्या संकल्पनेतून आणि कवी उद्धव कानडे यांच्या लेखणीतून साकार झालेले हे अभिरूप न्यायालय कामगार साहित्य संमेलनात रसिकांची दाद घेऊन गेले.
महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले ग्रामस्थ शेतकरी हिवरे बाजार यांची साक्ष या अभिरूप न्यायालयात घेण्यात आली. त्यावेळी त्यांच्या पुढे गीता हा ग्रंथ देऊन सरकारी वकील म्हणाले “म्हणा!मी ईश्वर साक्षी खरे खरे सांगेल खोटे सांगणार नाही.” त्यावेळी हिवरे बाजारातील तो शेतकरी म्हणाला ..”मी पद्मश्री पोपटरावांना साक्षी मानून अगदी खरे सांगतो, पद्मश्री पोपटराव पवार आमचा देव हाय”.. या शेतकऱ्याच्या एकाच वाक्याने साहित्य रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. या अभिरूप न्यायालयात न्यायाधीश महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे होते तर सरकारी वकील कवी उद्धव कानडे, आरोपीचे वकील लेखक, निवेदक श्रीकांत चौगुले, इन्स्पेक्टर सुदाम भोरे, पट्टेवाला कवी राजेंद्र वाघ, पोलिस सुरेश कंक, बाजीराव सातपुते, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, लेखनिक कवी किरण भावसार, आणि साक्षीदार म्हणून महाराष्ट्रातील प्रख्यात कवी अरुण म्हात्रे, सुनिताराजे पवार, कामगार भूषण पुरुषोत्तम सदाफुले, डॉ. मुकुंद कुळे, बाळासाहेब बाणखेले होते.
पद्मश्री पोपटराव पवार यांना अटक करून आणताना हिवरे बाजारचे असंख्य कार्यकर्ते “पोपटराव पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है ” अशा घोषणा देत होते.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन केले. सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यामध्ये न्यायालयीन द्वंद झाले. अखेर न्यायाधीशांनी निकाल जाहीर केला. निकाल असा होता.. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या या पुढील सर्व कामगार साहित्य संमेलनामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांनी आलेच पाहिजे अशी सौम्य शिक्षा त्यांना देण्यात आली.
हे अभिरूप न्यायालय १७ व्या कामगार साहित्य संमेलनाचे विशेष आकर्षण ठरले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *