मोशीतील नक्षत्र आयलँड सोसायटीचा पाणी प्रश्न निकालात !

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी – दि २७ फेब्रुवारी २०२३

 

– आमदार महेश लांडगे यांनी ‘शब्द’ पाळला

– सुमारे ७० हजार लीटर पाणी पुरवठा वाढणार

मोशी परिसरातील नक्षत्र आयलॅन्ड सोसायटीधारकांना पाणी समस्येचा सामना करावा लागत होता. यावर तोडगा काढण्यासाठी आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार, नवीन कनेक्शन कार्यान्वयीत करण्यात आले. त्यामुळे सुमारे ७० हजार लीटर अतिरिक्त पाणी पुरवठा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी, सोसायटीधारकांना दिलासा मिळाणार आहे.

नक्षत्र आयलॅन्ड सोसायटीमध्ये पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. याबाबत चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह पदाधिकारी आणि रहिवाशांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले होते. यासंदर्भात सोसायटीधारकांची काही दिवसांपूर्वी बैठकही झाली होती. त्या बैठकीत लवकरात लवकर हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे आश्वासन आमदार लांडगे यांनी दिले होते.

दरम्यान, नवीन आळंदी रस्ता (बीआरटी) रोड येथून नवीन नळजोड देण्याबाबत प्रशासकीय पातळीवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला. त्या जलवाहिनीचे काम आता पूर्ण झाले आहेत. त्याद्वारे सोसायटीधारकांना नवीन नळजोड देण्याचे कामही सुरू झाले आहे. यामुळे सुमारे ३७५ सदनिकाधारकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते सागर हिंगणे यांनी दिली.

प्रतिक्रिया :

सोसायटीधारकांना पायाभूत सोयी-सुविधा सक्षमपणे देण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत. उन्हाळ्याच्या तोंडावर काही भागामध्ये पाणीटंचाईचा समाना करावा लगत आहे. मात्र, सोसायटीधारकांनी तक्रार मांडल्यानंतर तात्काळ निराकरण करण्यासाठी आम्ही कायम पुढाकार घेतला आहे. आंद्रा धरणातील पाणी शहरात आता दाखल झाले आहे. त्याचे ‘वॉटर टेस्टिंग’ सुरू आहे. या प्रकल्पाचे पाणी नियमित सुरु झाल्यास समाविष्ट गावांतील नागरिकांना आणखी दिलासा मिळणार आहे.
महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *