शिरूर च्या सुपुत्री व प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी इरोळे यांना पुणे येथील रणरागिनी नॅशनल ॲवॉर्ड जाहीर

बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे.
शिरूर : दि. १६/०२/२०२३.

 

 

वेद फाउंडेशनच्या अध्यक्षा व पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या स्वातीताई मोराळे, या वेद फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी जागतिक महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना “रणरागिनी नॅशनल अवॉर्ड” या पुरस्काराने सन्मानित करत असतात.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक महिला दिनानिमित्त हा अवॉर्ड देण्यात येणार असून, कलाक्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट शिरूर, अश्वयुग फिल्म प्रोडक्शन, अश्वयुग ॲडव्हर्टायझिंग एजंसी, अश्वयुग इव्हेंट मॅनेजमेंट, अश्वयुग महिला मंच या संस्थेच्या संचालिका व अभिनेत्री, कोरिओग्राफर अश्विनी भाऊसाहेब इरोळे यांना वेद फाउंडेशनचा यावर्षीचा “रणरागिनी नॅशनल अवार्ड” जाहीर करण्यात आलाय.

अश्विनी इरोळे यांनी नटराज कोहिनूर ड्रीम्स अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून, दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक शाळा, कॉलेज मध्ये जाऊन मोफत अभिनय, डान्स कार्यशाळा राबवून कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले असून, त्या स्वतः एक उत्कृष्ट अभिनेत्री ,कोरिओग्राफर आहेत. मराठी भाषेसह हिंदी, मल्याळम भाषेतील गाणी तसेच चित्रपटांमध्ये त्यांनी मुख्य भूमिका केलेल्या आहेत. संगीत मराठी, टी – सिरीज सह २४ नामांकित प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेले “तू माझी पिपाणी” या गाण्यात त्यांनी नृत्य दिग्दर्शिकेसह मुख्य भूमिका साकारलेली आहे. नुकतेच त्यांनी कोरिओग्राफर म्हणून काम पाहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारीत “राजं राजं शिवबाराजं” हे गाणं प्रदर्शित झालेले आहे. बॉलिवूड चे प्रसिद्ध अभिनेते अमन वर्मा यांच्या बरोबरही त्यांनी भूमिका केलेली असुन, “एन. आर. आय. डायरी” आणि “गॉड ब्लेस यू” हे त्यांचे हिंदी चित्रपट तसेच काही मराठी चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. त्या सामाजिक क्षेत्रातही अश्वयुग महिला मंचच्या माध्यमातुन कार्यरत असतात.
वेद फाउंडेशनचा हा दिमाखदार पुरस्कार सोहळा, दिनांक १२ मार्च २०२३ रोजी जाधव इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनल हॉल, नऱ्हे, सिंहगड रोड, पुणे येथे संपन्न होणार असल्याचे त्यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्क तथा केबल टीव्ही चॅनल शी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *