शिरूर तालुक्यात मानव विकास परिषदेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल : खंडणी प्रकरण
बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. १७/०२/२०२३.

सणसवाडी, ता. शिरुर, जी. पुणे येथील कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत, नंतर एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर यांच्याविरुद्ध आणखी एकदा खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिलीय.
सणसवाडी (ता. शिरुर) येथील “क्रोमवेल इंजिनिअरिंग” कंपनीत ०६/०२/२०२३ रोजी मानव विकास परिषदेचे लेटर पाठवून, कंपनीच्या बांधकामाच्या परवानग्यांची माहिती द्या, अन्यथा कंपनीच्या विरोधात आंदोलन करु असा इशारा दिला होता. त्यानंतर सदर संघटनेचा पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर याने कंपनीचे एच आर मॅनेजर प्रवीण बडदे यांना भेटून कंपनीत ठेका द्या नाहीतर महिन्याला पंधरा हजार रुपये द्या, मग मी माघार घेतो असे म्हणत खंडणी मागितली होती. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करत, निलेश दरेकर याला अटक करण्यात आलेली होती.
या प्रकरणानंतर शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी आवाहन केले होते की, जर अशाप्रकारचा त्रास कुणाला होत असेल तर न घाबरता ताबडतोब पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. या आवाहनानंतर तात्काळ “क्राफ्ट्समन ऑटोमेशन लिमिटेड” या कंपनीत देखील, मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख यांच्या सांगण्यावरुन पुणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश दरेकर याने लेटर देत व माहिती मागवून, कंपनीचे एच आर मॅनेजर महेश खन्ना व इतरांना भेटून कंपनीत दिलेले कामाचे कोटेशन मंजूर करा अन्यथा तुमची कंपनी कशी चालते हे पाहतो असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी करत धमकी देऊन ठेक्याच्या स्वरुपात खंडणी मागितल्याची तक्रार पुढे येऊन, याबाबत ईराज तिरंदास फरीदाणी, रा. खराडी, पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्यामुळे शिक्रापूर पोलिसांनी मानव विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अफसर शेख व जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर, रा. सणसवाडी, ता. शिरुर, जि. पुणे या दोघांच्या विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल केलेले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर व पोलीस नाईक अतुल पखाले हे करत आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली असून, कोणत्याही संघटनांच्या नावाखाली अशाप्रकारच्या खंडण्या मागितल्या गेल्या, तर कायद्याच्या कचाट्यात अडकायला अजिबात वेळ लागणार नाही, हे मात्र नक्की. त्यामुळे दररोज नवीन येत असणाऱ्या विविध संघटनांनी आपले मुख्य समाजहिताचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन चालले, तर खऱ्या अर्थाने समाजहित साधले जाईल व अशाप्रकारचे गुन्हे दाखल होणार नाहीत हे देखील तेवढेच सत्य आहे.