जांबुत सहकारी सोसायटीचे संचालक नाथा जोरी यांचे संचालकपद बरखास्त

दि. १६/०१/२०२३

रवींद्र खुडे : विभागीय संपादक

शिरूर

शिरूर : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या जांबुत या एका मोठ्या गावच्या सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक नाथा देवराम जोरी यांचे पद बरखास्त झाले आहे. तसा आदेश, शिरूर सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक एस. एस. कुंभार यांनी दि. १२ जानेवारी २०२३ रोजी दिला आहे.

या आदेशात दिलेल्या माहितीनुसार, जांबुत सहकारी सोसायटीची सन २०२२ ते २०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी काही महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडलेली होती. त्यात नाथा जोरी हे संचालक म्हणून निवडून आलेले होते. परंतु त्यांना सहा अपत्ये असल्याची माहिती त्यांनी लिहून दिलेल्या प्रतिज्ञापत्रात लपवून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे.

तक्रारदार संतोष मारुती जोरी यांनी याबाबत तक्रार करत पुरेसे पुरावे सहाय्यक निबंधक कार्यालयास सादर केले होते. त्यामुळे संबंधित विभागाने अनेकवेळा सुनावणीसाठी तारखा देऊनही वैद्यकीय कारणास्तव नाथा जोरी सतत अनुपस्थित राहिल्याने, नियमानुसार व सर्व कागदपत्रांच्या तपासणीनंतर त्यांचे पद हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क (अ) पोटकलम १ (vii) नुसार बरखास्त करून, पुढे कोणत्याही सहकारी संस्था किंवा समितीवर नाथा जोरी हे निवडून जाण्यास पात्र नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, नुकत्याच झालेल्या जांबुत ग्रामपंचायत निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजावलेले नाथा जोरी, यांची या निर्णयामुळे राजकीय विकेट पडल्याची तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *