प्रवाशाच्या बॅगेची चोरी; इंडिगो एअरलाइन्सच्या भोंगळ कारभाराचा फटका

दि. १३/०१/२०२३

रोहित खर्गे : विभागीय संपादक

पुणे

 

पुणे : देशांतर्गत प्रवासी वाहतुकी दरम्यान विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग चोरी होण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यातही इंडिगो एअरलाइन्सने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅग चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. इंडिगो प्रवाशांच्या बॅग चोरीमध्ये इंडिगोच्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात असावा असा दाट संशय असल्याचा आरोप पवना समाचारचे संपादक व मराठी पत्रकार परिषदेचे पुणे विभागीय सचिव अरुण उर्फ नाना कांबळे यांनी केला आहे.

नाना कांबळे हे इंडिगो एअरलाइनच्या फ्लाईट क्रमांक ६ ई६७२८ ने दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी ६.३० वाजता अहमदाबाद गुजरात येथून हैदराबादला जात होते. या प्रवासात त्यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग गहाळ झाली आहे.ही बॅग हैदराबाद विमानतळावर आलीच नाही. याबाबत दिनांक 28 डिसेंबर रोजी इंडिगो प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.

यावेळी इंडिगो कर्मचाऱ्यांनी बॅग मिळवून देण्यासाठी 24 तासाची मुदत मागितली होती. दिनांक 29 डिसेंबर रोजी सायंकाळी पुन्हा हैदराबाद येथे नाना कांबळे यांनी इंडिगो कार्यालयाशी संपर्क साधला असता, बॅग सापडली नसून 48 तासांची मुदत इंडिगो प्रशासनाने मागितली. दिनांक 30 डिसेंबर रोजी इंडिगो कंपनीकडून नाना कांबळे यांना फोनवरून सांगण्यात आले की दिनांक 28 डिसेंबर रोजी रात्री नंतरच्या फ्लाईटने सदरची बॅग हैदराबादला पाठविण्यात आली आहे ती बॅग 29 डिसेंबरच्या पहाटे एक वाजता हैदराबादला पोहोचली आहे. याबाबत इंडिगो प्रशासनाला विचारले असता सदरची बॅग नंतरच्या फ्लाईटने पाठवल्याचे मला का कळविण्यात आले नाही यावर इंडिगो व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त करण्या व्यतिरिक्त काही केले नाही व ही बॅग पिंपरी येथे आपल्या निवासस्थानी पाठविण्यात येईल असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

मात्र दिनांक 31 डिसेंबर रोजी इंडिगो व्यवस्थापनाने पुन्हा फोनवर सांगितले की सदर बॅग नंतरच्या फ्लाईटने पाठवली असतानाही ती पुन्हा हैदराबाद विमानतळावरून गहाळ झाली असून ती बॅग कोठे गेली आहे ते आम्ही शोधत आहोत.

नाना कांबळे हे दिनांक 29 रोजी रात्री हैदराबादहून परत पुण्याला आले होते दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी नाना कांबळे यांची कन्या पूजा हिने हैदराबाद येथे जाऊन बॅग गहाळ झाल्याची पोलीस फिर्याद दिली आहे. यावेळी हैदराबाद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर बॅग हैदराबाद येथे आलीच नसल्याचे स्पष्ट केले आहे.

दिनांक ६ जानेवारी 2023 रोजी नाना कांबळे यांनी स्वतः अहमदाबाद विमानतळ पोलिस स्टेशन वरती जाऊन बॅग हरवण्याची पोलीस तक्रार नोंदवली आहे पण हा अहमदाबाद येथील इंडिगो व्यवस्थापन तसेच पोलीस अधिकारी या तक्रारीची गंभीर दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.
यासंदर्भात अहमदाबाद विमानतळावर मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो व्यवस्थापनाने नंतर ज्या फ्लाईटने बॅग पाठवली असल्याचे कळले होते तशी कोणतीही फ्लाईट इंडिगोची नसल्याचे स्पष्ट झाले आहे याचवेळी नाना कांबळे हे दिनांक 28 डिसेंबर रोजी ज्या विमानाने अहमदाबाद येथून हैदराबादला गेले होते त्याच विमानाने त्यांचे बॅग पाठवली होती असा खुलासा इंडिगो व्यवस्थापनाने केला मात्र ती बॅग नक्की कोठे गेली व कुठून गहाळ झाली याची कोणतीही माहिती इंडिगो व्यवस्थापनाकडून अद्याप देण्यात आली नाही.

इंडिगो कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याचे दिसून येत असून इंडिगोच्या अतिशय भोंगळ कारभाराचे दर्शन यामुळे होत आहे. या बॅग चोरी प्रकरणात इंडिगोचेच कर्मचारी व अधिकाऱ्यांचा हात असावा असा संशय येत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता दिवसभरात देशभरातील विमानतळांवरून दररोज शंभरहून अधिक इंडिगो कंपनीच्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगा चोरीला गेल्याच्या तक्रारी नोंदविल्या जात असल्याचे दिसून येते. इंडिगो व्यवस्थापन मात्र या गंभीर प्रकाराची कसलीच दखल घेत नसून त्यांच्या या भोंगळ कारभारामुळे रोज शेकडो प्रवासी हवालदिल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *