माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना महापालिकेतर्फे अभिवादन

दि. ११/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : जय जवान जय किसान या क्रांतिकारी घोषणेचा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे स्वातंत्र्य लढ्यातील थोर स्वातंत्र्यसैनिक आणि प्रखर देशभक्त होते, त्यांची साधी राहणी तसेच सैनिक व शेतकऱ्यांबद्दलची आत्मियता सर्वांना सदैव प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांच्या पुण्यतिथी निमित्त पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी विशेष अधिकारी किरण गायकवाड, कनिष्ठ अभियंता राजदीप तायडे, वृशाली पाटील, रिनल तिडके, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, कर्मचारी महासंघाचे बालाजी अय्यंगार तसेच कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेऊन माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी भारताचे पंतप्रधान पद भूषवून देशाला दिशा दिली तसेच केंद्रीय परराष्ट्रमंत्री पद देखील भूषवले होते. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान सर्वांच्या कायम स्मरणात राहील असेही अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *