नवीन पिढी पारंपारिक व्यसनांसह समाज माध्यमांच्या व्यसनाच्या विळख्यात : सहाय्यक पोलीस आयुक्त, प्रेरणा कट्टे

दि. १०/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : केवळ काही घातक पदार्थांचे सेवनच नाही तर मोबाईल, समाज माध्यमे, ऑनलाईन गेम अशा अनेक व्यसनांच्या आहारी नवीन पिढी जाताना दिसत आहे, ही दुर्दैवाची बाब आहे. पालकांनी देखील आपली मुले कोणाच्या संगतीत राहतात, कुठल्या प्रकारचे गेम खेळतात, समाज माध्यमांवर किती वेळ सक्रिय राहतात अशा अनेक गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. नवीन पिढी पारंपारिक व्यसनांसह समाज माध्यमांच्या व्यसनाच्या विळख्यात अडकत चालली आहे, असे मत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी व्यक्त केले.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालया आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अधिकार्‍यांसाठी एकदिवसीय व्यसन जनजागृती प्रशिक्षण शिबिराचे आयोजन मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रात करण्यात आले होते, त्याच्या उद्घाटन प्रसंगी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे बोलत होत्या.

यावेळी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ. मुक्ता पुणतांबेकर तसेच मुक्तांगण मित्र आणि प्रसिद्ध मॅरेथॉनपटू राहुल जाधव उपस्थित होते.

यावेळी बोलताना पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे म्हणाल्या की, पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त संपूर्ण सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहिमे अंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनचा एक अधिकारी अशा १८ अधिकार्‍यांसाठी हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. विविध शाळा, महाविद्यालये आणि झोपडपट्टी परिसरात ज्या ठिकाणी व्यसनाधीनतेचे प्रमाण जास्त आहे, त्याठिकाणी जाऊन पोलीस अधिकारी जनजागृती करणार आहेत. व्यसनाधीनतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. कारण ज्या व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेलेल्या असतात, त्या आपल्या व्यसन पूर्ततेसाठी गुन्हेगारी मार्गांचा अवलंब करतात. व्यसनाधीनतेचे प्रमाण कमी झाले तर गुन्हेगारीचे प्रमाण देखील कमी होण्यास हातभार लागेल, असा मला विश्वास आहे. कोणत्याही प्रकारचे व्यसन हे मानवी जीवनाला घातक ठरणारे आहे.

यावेळी बोलताना डॉ. मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या की, व्यसनाधीनता हा एक गंभीर सामाजिक प्रश्न झाला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने या संदर्भात केलेल्या मार्गदर्शनानुसार व्यसनाधीनतेच्या बाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. एक म्हणजे व्यसनांची उपलब्धता कमी करणे आणि दुसरे म्हणजे ज्यांना व्यसन लागले आहे अशा व्यक्तींची व्यसन करण्याची गरज कमी करणे. या दोन्ही पातळ्यांवर प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्यांना व्यसन आहे अशा व्यक्तींची व्यसन करण्याची गरज कमी करण्यासंदर्भात मुक्तांगणमध्ये काम केले जाते. तर पोलीस दल हे व्यसनांची उपलब्धता कमी करण्यासंदर्भात महत्त्वाचे काम करीत आहे. पोलीस दल आणि मुक्तांगण या दोन्ही यंत्रणा एकत्रितपणे काम करू शकल्या तर व्यसनाचा गंभीर प्रश्न समाजात आणखी वाढू नये यासाठी निश्चितपणे ठोस कृती कार्यक्रम करणे शक्य होईल. व्यसन हा आजार असून हा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक स्वरूपात देखील काम करता येते, असा विश्वास मुक्तांगणला आहे. व्यसनांविषयी योग्य माहिती मिळाल्यास मुलांमध्ये व्यसनाबद्दल उत्सुकता निर्माण होणार नाही आणि त्यांना व्यसनापासून परावृत्त करणे सहज शक्य होईल.

या कार्यशाळेत 18 पोलीस अधिकाऱ्यांना व्यसनासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. व्यसन कशाला म्हणायचे, व्यसनांचे प्रकार, व्यसनाला आजार का म्हणायचे, मुलांनी व्यसनाकडे वळू नये म्हणून आपण काय प्रयत्न करू शकतो अशा विविध मुद्यांसंदर्भात पोलिस अधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. या माहितीचा उपयोग करून हे पोलीस अधिकारी पिंपरी – चिंचवड मधील सर्व शाळांमध्ये जाऊन व्यसनांसंदर्भात जनजागृती करणार असून या मोहिमेत प्रत्येक अधिकार्‍या बरोबर मुक्तांगणचा एक कार्यकर्ता देखील सहभागी होणार आहे.

यावेळी राहुल जाधव यांनी व्यसनाधीनता, गुन्हेगारी पासून ते प्रसिद्ध मॅरेथॉनपटू असा आपला प्रेरणादायी प्रवास थोडक्यात उलगडून सांगताना मुक्तांगण मधील अनुभवांचे कथन केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *