राजमाता जिजाऊ जयंती सामूहिक साजरी करावी : आमदार महेश लांडगे

दि. १०/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांची जयंती शासकीय, अशासकीय तसेच सर्व अस्थापनांमध्ये साजरी करण्यात यावी. त्यासाठी संबंधित विभागांना सूचना द्याव्यात. महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास नव्या पिढीमध्ये रुजवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशा सूचना भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिल्या आहेत.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, हिंदवी स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ यांचा इतिहास आणि विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने जिजाऊ जयंती सामूहिकपणे साजरी करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती संवर्धनासह शिव-शंभूंचे विचार तळागाळात आणि घराघरांत पोहोचवणे काळाची गरज आहे. हे संस्कार आणि विचार जनमाणसांत रुजवण्यासाठी शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्ज्वलीत करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती शाळा, घर, शासकीय, निम शासकीय कार्यालये तसेच खासगी अस्थापनांच्या ठिकाणी साजरी करण्यात यावी, अशी आमच्यासह अनेक शिवप्रेमी संस्था, संघटनांची मागणी आहे. त्यासाठी सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.

राजमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा मनोदय केला. तो पूर्ण करण्याकरिता छत्रपती शिवरायांवर तसे संस्कार केले. स्वातंत्र्य, स्वराज्य, प्रजेचे हित, धर्मरक्षण याकरिता अखंड प्रयत्न करणाऱ्या राजमाता संपूर्ण जगभरातील माता-भगिनींसाठी आदर्श आहेत. त्यामुळे राजमाता जिजाऊंचे कार्य आणि इतिहास भावी पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठी जिजाऊंची जयंती सार्वजनिक आणि सामूहिकरित्या साजरी करावी, अशी आमची मागणी आहे.
 

– महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *