पीएमआरडीएचे पिंपरी-चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने सुरू करा, रेमडेसिवीरसाठी डिजीटल प्रिस्क्रिप्शन स्वीकारा; आमदार लक्ष्मण जगतापांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी, दि. १६ एप्रिल २०२१ पिंपरी-चिंचवडमध्ये नेहरूनगर येथे पीएमआरडीएमार्फत कार्यान्वित करण्यात आलेले जम्बो कोवीड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे, रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी डिजीटल प्रिस्क्रिप्शन स्वीकारण्यात यावे, रुग्णांची हेळसांड रोखण्यासाठी स्थानिक विकास निधीतून घेतलेल्या सर्व अॅम्ब्युलन्स प्रशासनाने ताब्यात घेऊन संचलन करावे, रुग्णालयांतील बेडची माहिती देण्यासाठी उपलब्ध केलेली लिंक बोगस असून, ती अद्ययावत करावी तसेच रेमडेसिवीर इंजेक्शनचा मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुक्रवार) पुण्यात कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार लक्ष्मण जगताप यांनी कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्याबाबत तसेच उपाययोजना करताना येणाऱ्या अडचणीबाबत अजित पवार यांना पत्र दिले.

आमदार जगताप यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी-चिंचवडध्ये नेहरूनगर येथे पीएमआरडीएमार्फत जम्बो कोवीड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. परंतु, हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आलेले नाही. जम्बो कोवीड रुग्णालयात ८०० बेड उपलब्ध असतील असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ५५० बेड कार्यान्वित आहेत. हे रुग्णालय चालवणाऱ्या ठेकेदाराकडे वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे ते पूर्ण क्षमतेने सुरू करू शकले नाहीत. त्यामुळे अन्य एखाद्या ठेकेदारामार्फत उर्वरित बेड कार्यान्वित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणेत यावेत. रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू करण्यात आलेले हेल्पलाइन क्रमांक चार-चार तास बिझी असतो. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीत एक प्रकारे नागरिकांचा छळ करण्याचाच हा प्रकार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कॉल सेंटरमार्फत आणखी तीन ते चार नंबर उपलब्ध करून देण्यात यावेत. जेणेकरून नागरिकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी नोंदवणे सहज शक्य होईल.

एफडीए इन्स्पेक्टर संगनमताने त्यांच्या ओळखीच्या रुग्णालयाला इंजेक्शन पुरवण्याची सक्ती करतात. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नोंदवण्यात आलेल्या रुग्णांचा सिटीस्कॅनचा स्कोअर बघून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्याची सोय करावी. त्यासाठी डिजीटल अॅप तातडीने डेव्हलप करावे. त्यामुळे मागणी केलेल्या कोणत्या रुग्णाच्या नातेवाईकाला इंजेक्शन उपलब्ध होणार आहे याची माहिती सहजगत्या मिळेल. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्यात यावी. तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असतानाही रुग्णांना बाहेरून इंजेक्शन आणण्याची सक्ती केली जाते. या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. पुणे जिल्ह्यातील रुग्णांसाठी दररोज १८ हजार रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी असताना प्रत्यक्षात केवळ ३ ते ६ हजार इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. मागणीप्रमाणे इंजेक्शनचा पुरवठा होईल यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात यावेत.

आमदार निधीतून २५ लाख रुपये खर्चून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्याची आपण जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे. या खरेदीला खास बाब म्हणून राज्य सरकारकडून मान्यता देण्यात यावी. स्थानिक विकास निधीतून घेतलेल्या सर्व अॅम्ब्युलन्स ताब्यात घेऊन त्यांचे संचलन जिल्हा प्रशासनामार्फत व्हावे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होणार नाही आणि रुग्णांकडून अधिक पैशांची मागणी होणार नाही. विविध रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध असल्याबाबतचा डिजिटल डॅशबोर्ड दररोज अपडेट करण्यात यावा. परंतु, त्यासाठी उपलब्ध केलेली Covidpune.com ही लिंक बोगस आहे. या लिंकमधील एकाही रुग्णालयाला संपर्क होत नाही. बरेच संपर्क क्रमांक अस्तित्वातच नसल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ बोगस लिंक बनवून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. त्याबाबत गांभीर्याने विचार होऊन नागरिकांसाठी अद्ययावत लिंक प्रसिद्ध करण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *