मोशी टोलनाका बंद करा!; हौसिंग फेडरेशनची मागणी

दि. ०७/०१/२०२३
पिंपरी


पिंपरी : मोशीतील इंद्रायणी नदी पुलाजवळ असलेला मोशी पथकर वसुली टोलनाका काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्याने बंद केला होता. मात्र, हा टोलनाका पुन्हा सुरू करुन वाहनचालकांकडून वसुली सुरू केली आहे. मोशी आणि चांडोली टोलनाका येथे सुधारित पथकर लागू करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 5 जानेवारी रोजी सूचना जारी केली आहे. हा टोलनाका कायमचा बंद करावा, अशी वाहन चालकांची मागणी आहे. चिखली, मोशी, पिंपरी चिंचवड हौसिंग फेडरेशननेही तशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे केली आहे.

वास्तविक, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त आहेत. यामध्ये आता नागरिकांना आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. टोलनाक्‍यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यामुळे अनेक वर्षे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टोलनाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, आता पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा टोल कायमचा बंद करावा, अशी मागणी वाहन चालक करत आहेत.

दुसरीकडे, टोलनाक्यामुळे अनेक गावांना त्याचा फटका बसणार असून नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे. एकीकडे याठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत असून त्याचे नियोजन करण्यात येत नाही. रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे आहेत. यावर उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे.रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न धूळखात पडला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलनाका बंद करावा आणि स्थानिक नागरिकांची होणारी लूट थांबावी, अशी आग्रही मागणी आहे. अन्यथा स्थानिक नागरिक आणि सोसायटीधारकांना सोबत घेवून प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *