पार्किंग व नोपार्किंगबाबत वाहतूक शाखेकडून आदेश जारी

दि. ०७/०१/२०२३
पुणे


पुणे : पुणे शहरातील वाहतूक सुरक्षित व सुरळीत चालण्याच्या अनुषंगाने पुणे शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी शहरातील पार्किंग, नोपार्किंगसंबंधाने काही अंतिम आदेश तर काही तात्पुरते आदेश जारी केले आहेत.

यापूर्वी काढलेल्या तात्पुरत्या आदेशांवर प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करुन काही बाबतीत अंतिम आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विमानतळ वाहतूक विभागांतर्गत विमाननगर लेन क्रमांक २ ते श्रीकृष्ण हॉटेल आणि दत्त मंदीर चौक ते अपसाउथ हॉटेल लेन (विमाननगर लेन क्रमांक २) दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आले आहे. तर हॉटेल सांबर लेनच्या सुरवातीपासून ते अपसाउथ हॉटेल तसेच दत्त मंदिर चौक ते कैलास सुपर मार्केट चौक आणि द्वारका गार्डन चौक ते संघर्ष चौकापर्यंत सुमारे २०० मीटर पर्यंत पी १ पी २ असलेले पार्किंग घोषित करण्यात आले आहे. हे आदेश अग्नीशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू नसतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

तात्पुरत्या स्वरुपातील आदेशांवर हरकती व सूचना देण्याचे आवाहन
वाहतूक शाखेने विश्रामबाग वाहतूक विभागांतर्गत जिजामाता चौक ते फुटका बुरुज चौक तसेच फुटका बुरुज चौक ते वसंत दाते चौक या दरम्यान नो- पार्किंग घोषित करण्यात आल्याबाबतचे तात्पुरते आदेश जारी केले आहेत. त्याबाबत नागरिकांना काही हरकती व सूचना असल्यास पोलीस उप-आयुक्त वाहतुक शाखा, येरवाडा टपाल कचेरी, बंगला क्रमांक ६, पुणे येथे १७ जानेवारी २०२३ पर्यंत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हरकती व सूचनांचा विचार करुन अंतिम आदेश जारी करण्यात येतील, असेही श्री. मगर यांनी कळविले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *