भारतातील पहिल्या संविधान भवनच्या कामाला गती द्या – आमदार महेश लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
३० डिसेंबर २०२२

पिंपरी


देशातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये प्रस्तावित आहे. मात्र, गेल्या अडीच वर्षांच्या काळात या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात संविधान भवनाच्या कामाला गती द्यावी, अशी आग्रही मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन

याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, भारतीय संविधानाविषयी प्रत्येक नागरिक साक्षर करणे गरजेचे आहे. त्यासाठी देशातील पहिले ‘संविधान भवन’ पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक पाच व आठमधील मोकळ्या भूखंडावर हे ‘संविधान भवन’ उभारण्यात यावे. याबाबत आम्ही पाठपुरावा करीत आहोत.
संविधान भवनाची उभारणी झाल्यास संविधानाविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. या संविधान भवनाच्या माध्यमातून संविधानाची जनजागृती करण्यात येईल. संविधान भवनमध्ये अभ्यास केंद्र, त्यामध्ये तज्ज्ञांचे संविधानावर अभ्यास वर्ग, कार्यशाळा, इतर राष्ट्रांच्या घटना तुलनात्मक अभ्यासासाठी माहितीची उपलब्धता, ‘ई’-लायब्ररी, संविधानविषयी विविध पैलू चित्रकला दालन, यूपीएससी, एमपीएससी अभ्यासिका व अभ्यासवर्ग सुरु करण्याबाबत प्रस्ताव आहे.

महाविकास आघाडीमुळे प्रकल्प लांबणीवर

दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात संविधान भवनच्या कामाबाबात काहीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. गेल्या अडीच वर्षांत या भवनाचे काम अंतिम टप्पयात आले असते. आता पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या लौकीकात भर घालणाऱ्या संविधान भवनच्या उभारण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा. त्यासाठी ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील पेठ क्रमांक पाच व आठमधील किमान पाच एकर जागा उपलब्ध करुन आर्थिक तरतूद करावी आणि कामाला गती द्यावी, आग्रही मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *