शिरूर : दि. 02/06/2021.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे १८ जानेवारी २०२१ रोजी, भरदिवसा स्वप्निल रणसिंग या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आलेली होती. या खुनातील दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती. परंतु या खुनातील प्रमुख आरोपी व मास्टर माइंड असणारा नितिन गिताराम गावडे उर्फ नट्या व त्याचे साथीदार, हा गुन्हा घडल्यापासून फरार होते. तेव्हापासूनच शिरूर पोलिसांची पथके व पुणे LCB चे पथक त्यांच्या मागावर होते.
परंतु पोलिसांना इतके महिने गुंगारा देणाऱ्या नितीन गावडे व त्याच्या दोन साथीदारांना, शिरूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे व त्यांच्या पथकाने, न्हावराफाटा येथे बुधवार दि. ०२ जून २०२१ रोजी जेरबंद केले आहे. त्यात –
१) नितीन सीताराम गावडे उर्फ नट्या (वय ३० वर्षे, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर. जि. पुणे )
२) मोहन उर्फ पिंटु भाऊ चोरे, (वय ३३ वर्षे, रा.डोंगरगण, ता. शिरूर, जि. पुणे)
३) सुनिल अशोक सुंटले (वय ३६ वर्षे, रा. टाकळी हाजी, ता. शिरूर, जि. पुणे)
या तिघांना अटक करण्यात आलीय.
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे भर दिवसा व वर्दळीच्या ठिकाणी, सर्कल ऑफिस जवळ स्वप्नील रणसिंग या तरुणाची दोघा जणांनी आठ गोळ्या घालून हत्या केलेली होती. त्यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडालेली होती. रणसिंग यांच्या कुटुंबीयांनी व नातलगांनी त्यावेळी, टाकळी हाजी पोलीस औट पोस्ट येथे जमून, कित्येक तास स्वप्नील रणसिंग याचे प्रेत ताब्यात न घेता, सर्व आरोपींना पकडत नाहीत तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तेथील वातावरण चिघळत चाललेले होते. तेव्हा टाकळीहाजी येथील प्रतिष्ठित नागरिक, तसेच माजी आमदार पोपटराव गावडे, त्यांचे चिरंजीव घो. सह. सा. का. चे संचालक राजेंद्र गावडे, सरपंच दामू घोडे, पं. स. सदस्य डॉ. सुभाष पोकळे, जी. प. सदस्या सुनीता गावडे, पं. स. सदस्या अरुणा घोडे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी व अनेक लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करत, रणसिंग कुटुंबियांना विश्वासात घेत शेवटी खूप प्रयत्नांनी स्वप्नीलचा अंत्यविधी पार पाडलेला होता.
पोलिसांनी तात्काळ पकडलेल्या आरोपितांमध्ये –
१) विजय गोविंद शेंडगे उर्फ कोयत्या,
२) बबलू खंडू माशेरे
(दोघेही राहणार आमदाबाद, ता. शिरूर, जि. पुणे) या दोघांचा समावेश होता.
तर या हल्ल्याचा मास्टर माइंड नितीन गिताराम गावडे उर्फ नट्या व त्याचे दोन साथीदार मात्र तेव्हापासूनच फरार होते. या आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी तेव्हापासूनच अनेक पथके पाठवलेली होती. परंतु हे आरोपी पोलिसांना सापडत नव्हते.
परंतु बुधवार दि. २ जून २०२१ रोजी गोपनीय बातमीदाराने शिरूर पोलिसांना बातमी दिली की, सदरचे हे फरार आरोपी न्हावरा फाटा येथे एकत्र येणार आहेत. ही खात्रीशीर बातमी शिरूर पोलिसांना मिळाल्याने, सदर आरोपींना पकडण्यासाठी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, पो. कॉ. करणसिंग जारवाल, पो. कॉ. नाथसाहेब जगताप व इतर पोलीस पथकाने बातमी मिळाले ठिकाणी न्हावरा फाटा परिसरात सापळा रचुन, सदर आरोपींना अलगद ताब्यात घेतले.
शिरूर पोलीस स्टेशन येथे त्यांच्यावर पुढीलप्रमाणे गुन्हे नोंद आहेत –
३०२, ३०७, १२०(ब),१०९, २१२ आर्म अॅक्ट ३, २५, २७ हे गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपितांविरूध्द, क्री. प्रो. कोड. कलम ८२ प्रमाणे, मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिरूर, यांचे आदेश झाले होते. त्या आदेशांचे देखील आरोपींनी पालन न करता, सदर आदेशाचा अवमान केलेला होता.
सदर फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात मिळाल्यावर, त्या आरोपींना शिरूर न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाने सदर आरोपींना दि. १२/०६/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली, तसेच बारामती विभागाचे अप्पर पो. अधीक्षक मिलिंद मोहिते व दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सूचनांनुसार, शिरुरचे पो. नि. प्रवीण खानापुरे व टीमने या गुन्ह्याचा शोध लावला.
या गुन्ह्याबाबतचा पुढील अधिक तपास, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे करत आहेत.