आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील; उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

२९ डिसेंबर २०२२

नागपूर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॉ. हेडगेवारांना अभिवादन केले. तर, दुसरीकडे शिंदे गटाकडून मुंबई महानपालिकेतील शिवसेना कार्यालयावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे.

दोन आठवड्यांपासून हिवाळी अधिवेशन सुरू आहे, विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडलाय हे दिसतंय. अधिवेशन संपल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी जनतेला काय दिलं, हा प्रश्न राहणार आहे. त्याचं उत्तर या सगळ्यांनी दिलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अधिवेशन काळामध्ये रोज एकेक मंत्र्याच्या घोटाळ्यांविषयी आरोप झालेत, चर्चा झाली आहे. इतिहास पाहिला तर आरोपांची गंभीरता लक्षात घेऊन त्या त्या मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. यावेळी तसं होईल असं वाटत नाही. पण गेल्या सहा महिन्यांत हे सरकार नेमकं करतंय काय, हे लोकांच्या समोर आलंय. एनआयटीपासून घोटाळ्यांची सुरुवात झाली. मग सत्तार, उदय सामंत या सगळ्यांच्या घोटाळ्यांबाबत सरकार काय करणार? की आरोप झाले त्यांना क्लीनचिट आणि आरोप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणं हेच या सरकारचं धोरण आहे का? हे सरकारने स्पष्ट करायला हवं, असं ते म्हणाले

काल मुंबई महापालिकेत मिंधे गट गेला होता, आज तर आरएसएस कार्यालयात गेला होता. ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वत: काही निर्माण करण्याची ताकद नसते ते सरळ सरळ चोऱ्या करतात किंवा दुसऱ्यांच्या गोष्टींचा ताबा घेतात. शेवटी हा मानसोपचार तज्ज्ञांना विचारण्याचा विषय आहे. काहींच्या मनात न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाहीये. काहीतरी केलं तर पाहिजे. त्या न्यूनगंडाची जाणीव असते. मग ते न्यूनगंडाचं रुपांतर अहंगंडात करतात. दुसऱ्यांचे नेते, पक्ष, ऑफिस बळकवायचं, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टीका केली.

आज ते आरएसएस कार्यालयातून बाहेर पडले असावेत. पण मोहन भागवतांना मी विचारतोय की कार्यालयाचा कोपरान् कोपरा तपासून बघा. कुठे लिंब टाकलेत का तेही बघून घ्या. कदाचित आज आरएसएसच्या कार्यालयातही ते ताबा घेण्यासाठीच गेले असतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *