बातमी : विभागीय संपादक रवींद्र खुडे
शिरूर : दि. 23/06/2021.
शिरूर येथील जुन्या पिढीतील सोन्या – चांदीचे प्रसिद्ध व्यापारी तसेच शिरूरच्या श्री वर्धमान जैन श्रावक संघाचे माजी संघपती, भवरीलाल जुगराज फुलफगर (वय ८९ वर्षे) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात बहिण, दोन मुले, तीन मुली, सूना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा सुस्वभाव व आयुर्वेदिक उपचार व सल्ल्यामुळे, त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार निर्माण केलेला होता.
धर्मकारण, समाजकारण व राजकारणाचा गाढा अभ्यास असलेल्या भवरीलाल फुलफगर यांचे, शिरूर शहर व परिसरातील धार्मिक कार्यात मोठे योगदान होते. प्रत्येक बाबीमागील शास्त्रीय कारण, विविध आजारांवरील आयुर्वेदीक उपचार याविषयी त्यांचा मोठा अभ्यास होता. जुन्या चालीरीती, परंपरा व त्यामागील शास्त्रीय कारणांची जाण असलेले भवरीलाल फुलफगर हे त्यांच्याकडे येणाऱ्यांना, या परंपरांची महती सांगतानाच त्यामागील शास्त्रीय दृष्टीकोनही पटवून देत असत. मग, ती नागीण उतरविणे असो, की मुतखड्याचा त्रास असो किंवा अन्य कोणताही शारीरिक त्रास असो, या सर्वांचा आयुर्वेदिक उपचार त्यांच्याकडे असल्याने, आत्ता अलीकडील काही दिवसांपर्यंत लोक त्यांच्याकडे सल्ला घेण्यासाठी जात असत. कोणतीही फी न घेता, भाऊ लोकांना सल्ला देत असत व बरे वाटल्यानंतर पुन्हा लोक त्यांचे आभार मानायलाही येत असत.
अनेक लेखक, साहित्यिक, राजकारणी नेते त्यांच्याकडे आवर्जून येऊन हा जुना माहितीचा खजिना समजून घेत असत.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, सकाळचे दिवंगत संपादक अनंत दिक्षित, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री (स्व.) साबीर शेख आदींनी त्यांची आवर्जून भेट घेतली होती.
श्री वर्धमान जैन श्रावक संघाचे संघपती म्हणून, अनेक वर्षे फुलफगर यांनी शिरूर परिसरात मोठे धार्मिक कार्य केले. शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे विश्वस्त म्हणून शैक्षणिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. येथील आझाद हिंद गणेश मंडळाचे संस्थापक असलेल्या फुलफगर, यांचा या मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात पुढाकार होता. येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ जैन टेम्पल ट्रस्ट, सकल ओसवाल पंचायत, तिलोक पारमार्थिक संस्था यांचेही ते विश्वस्त होते. या संस्थांच्या धार्मिक, सामाजिक सेवाकार्यात ते अग्रेसर होते. धार्मिक, शैक्षणिक कार्यासाठी सहाय्य, दानधर्म यातही त्यांचा पुढाकार असे.
शिरूरचे माजी उपनगराध्यक्ष नेमीचंद फुलफगर व घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक धरमचंद फुलफगर ही त्यांची मुले होत.
आपल्या वाडीलांच्याच समजकार्याचा वसा, या दोन्ही मुलांनी मागील काही वर्षांपासून पुढे चालू ठेवत, भरघोस कार्य केलेले आहे. त्यात धरमचंद फुलफगर यांनी शिरूरसह, पारनेर, श्रीगोंदा व आंबेगाव तालुक्यातील दुष्काळी भागांना, टँकरद्वारे स्वःखर्चाने पाणी पुरवठा केलेला होता.
आमच्या वडिलांच्या वार्धक्यामुळे झालेल्या दुःखद निधनानंतरही, त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी मी, त्यांनी दिलेला समजकार्याचा वसा असाच पुढे चालू ठेवणार असल्याचे मत, धरमचंद फुलफगर यांनी आपला आवाज न्यूज नेटवर्कशी बोलताना व्यक्त केले.