चिदंबरस्वरुप उमाकांतभाऊ यांच्या जयंतीनिमित्ताने ओझर येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
१६ डिसेंबर २०२२

नारायणगाव


भगवान शिवांचा मूळअवतार समजल्या जाणाऱ्या भगवान शिवचिदंबर महास्वामींच्या साक्षात्काराने प्रेरीत होऊन; चिदंबर सेवा समितीच्या माध्यमातून शिवचिदंबर नामाचा महिमा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचविण्यासाठी अनेक ठिकाणी चिदंबर महास्वामींची मंदिरे उभारणारे चिदंबरस्वरुप परमपूज्य सद्गुरू उमाकांत भाऊ कुलकर्णी यांच्या जयंतीदिनी शनिवार दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजी शिवचिदंबरनगर ओझर (भोरवाडी फाटा) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. असल्याची माहिती प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यात भगवान शिवांचा मूळअवतार समजले जाणारे चिंदबर महास्वामी यांचा जन्म झाला. चिदंबर स्वामींनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला आणि चमत्कार दाखविले व लोकांना भगवतभक्तीचा मार्ग दाखविला. ‘शिव चिदंबर’ या नामात सर्व शक्ति सामावलेली आहे. नामस्मरण करत असता दुष्टांचेही अंतकरण दुष्टपणा सोडून प्रेमाने भरुन जाते; नाम घेता अज्ञानाचा नाश होतो. चिदंबर नाम सर्वात श्रेष्ट आहे. भगवंताच्या सर्व नामाचा मूळ हेतु सर्वश्रेष्ट आहे. जे शुद्ध निर्विशेष ब्रह्म तेच चिदंबर होय. तेच सर्व नामांचे जन्मस्थान आहे. तेथुनच सर्व अवतार होतात. चिदंबर ब्रम्ह आहे, चिदंबर कृष्ण आहे आणि चिदंबरच भगवान महादेव आहेत. जगाची उत्पत्ति तेथेच होते. व्यास महर्षिंनी स्कंद पूराणात चिदंबर महात्म्य वर्णिलेले आहे. सोळा हजार श्लोकांनी या नामाचा महिमा वर्णन केला आहे.

याच भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी, आजच्या तरुण पिढीला नाम सामर्थ्य समजण्यासाठी चिंदबर सेवा समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रात चिदंबर महास्वामींची मंदिरे उभारली. परमपूज्य उमाकांतभाऊ कुलकर्णी यांनी धर्माच्या प्रसारासाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यथित केले. म्हणून त्यांच्या जयंतीदिनाचे निमित्ताने शिवचिदंबर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सहा वाजता काकडा आरती, सकाळी ६-३० ते ७-३० रुद्राभिषेक, सकाळी ११ वाजता नैवेद्य आरती , सायंकाळी ४ ते ६ शिवचिदंबर महास्वामींचा पालखी सोहळा, रात्रौ ७ ते ९ संस्कृत विषयाचे गाढे अभ्यासक डॉ कल्पेश महाराज भागवत यांचे हरिकिर्तन आणि तद्नंतर महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी पंचक्रोशीतील भाविकांनी या जयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवचिदंबर देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *