शिंदे गटातील मंत्री उदय सामंत अडचणीत? निवडणूक आयोगाला खोटं प्रतिज्ञापत्र केले सादर

२८ डिसेंबर २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आणखी एक मंत्री अडचणीत आले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या पाठोपाठ उदय सामंत यांचा पाय खोलात जाण्याची दाट शक्यता आहे. टिळकनगर इंडस्ट्रीज कंपनीला राज्य सरकारने बेकायदा सबसिडी दिल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रत्नागिरी, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत अडचणीत येण्याची शक्यता आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे गटानं सामंत यांना लक्ष्य केलं आहे.

टिळक नगर इंडस्ट्रीजला २१० कोटी रुपयांची सबसिडी दिल्याचा आरोप केला जात आहे. या कंपनीचा एक प्रकल्प दाखवून हे अनुदान देण्यात आल्याचा आरोप आहे. एक प्रकल्प अहमदनगर, तर दुसरा प्रकल्प ३५० किलोमीटर लांब असलेल्या रत्नागिरी येथे आहे. मात्र दोन्ही कंपन्या मिळून एक कंपनी दाखवून या कंपनीला २१० कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे सरकारमधील शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

तसेच उदय सामंत यांनी 2014 आणि 2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात वाहन खरेदी मूल्य वेगवेगळी दाखवल्याचं उघड झालं आहे. सामंत यांचे वाहन क्रमांक एम.एच. 08:4599 वाहनाची खरेदी किंमत 2014 मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात वाहनाचं खरेदी मूल्य 13 लाख 28 हजार रुपये दाखवले होते. तर याच वाहनाची किंमत सामंत यांनी 2019 मध्ये 14 लाख 16 हजार रुपये दाखवली आहे.

त्याचसोबत कुरणे गावातील शेतजमीनीचे खरेदी मुल्य वेगवेगळी दाखवली आहेत. कुरणे गावातील सर्वे नंबर 334 /अ 338/ 2 ही शेतजमीन सामंत यांनी 2014 मध्ये 17 हजार रुपये खरेदी केल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दाखवत आहेत. आणि 2019 साली निवडणूक लढवत असताना सामंत यांनी याच शेत जमिनीची किंमत दहा हजार रुपये या रक्कमेला खरेदी केल्याचे प्रतिज्ञापत्रात दाखवत आयोगाची दिशाभूल केलेली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *