२४ डिसेंबर २०२२
राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतलं आहे, अशी खोचक टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
दिशा सालियन प्रकरणावरून सभागृहात गोंधळ सुरू असताना याविरोधात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले होते. ठाकरे गटाचे आमदार सुद्धा शांत होते. म्हणजे, राष्ट्रवादीनं उद्धव ठाकरे गटाला दत्तक घेतल्यासारखे ते भांडत होते. हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं आहे. पायऱ्यावर झालेल्या आंदोलनातही राष्ट्रवादी पुढं असल्याचे दिसून येते, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.
नागपूर NIT घोटाळ्याचे कागदपत्रं तपास यंत्रणांच्या हाती लागली असून हे प्रकरण दाबण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जात आहेत,असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. राऊतांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना शिरसाट म्हणाले की,संजय राऊत यांनी परवाचा उच्च न्यायालयाचा निकाल वाचलेला नाही. त्यांनी थोडा अभ्यास करण्याची गरज आहे. जो घोटाळा झालाच नाही, तो दाबण्यासाठी दिल्लीला जाण्याची आवश्यकता नाही. तपास यंत्रणा त्यांच्या प्रमाणे काम करत असते. तपास यंत्रणा कोणालाही सोडत नाही. प्रकरण दाबण्यासारख्या छोट्या गोष्टीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची आश्यकता नाही.