रेल्वेमार्ग उभारणीसाठी केलेल्या सुरुंगाच्या स्फोटात मायलेकराचा मृत्यू

कर्जत : खंडाळा घाटाखाली कर्जत परिसरात रेल्वेचे काम सुरू असताना केलेल्या सुरुंगाच्या स्फोटात उडालेल्या दगडांमुळे दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत.

देवकाबाई महादू बडेकर आणि सचिन महादू बडेकर राहणार किरवली अशी मृतांची नावे आहेत. तर, चंद्रकांत मऱ्या मोकल, वंदना चंद्रकांत मोकल, विकास भारत भोसले हे जखमी झाले आहेत.

सध्या कर्जत ते पनवेल रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. वडविहीर येथे काम सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तेथे सुरुंगाचे स्फोट घडविण्यात आले. या स्फोटामुळे कर्जत चौक मार्गावर अनेक दगड उडाले. त्यावेळी तेथून देवकाबाई बडेकर आणि सचिन बडेकर ही मायलेकरे दुचाकीवरून जात होती. त्यांच्या अंगावर दगड पडले. यामुळे देवकाबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर सचिन यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

या अपघातामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यास सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य ओळखत खालापूर तहसिलदार अय्युब तांबोळी, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, कर्जतचे विजय लगारे, खालापूरचे पोलीस निरीक्षक बाळा कुंभार, सुर्यवंशी व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती काबूत आणली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *