मुलांनीच केला जन्मदात्या वडिलांचा खून

पिंपरी : वडिलांचे अनैतिक संबंध मान्य नसल्याने निघोजे येथील दोन तरुणांनी आपल्या वडिलांचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. महाळुंगे पोलिसांनी या घटनेचा अवघ्या दोन तासात तपास करून आरोपीना अटक केली आहे.

धनंजय नवनाथ बनसोडे (वय 43, रा. निघोजे, ता. खेड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून सुजित धनंजय बनसोडे (वय 21) आणि अभिजीत धनंजय बनसोडे (वय 18) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

धनंजय बनसोडे यांचा ग्लोबल फूड्स नावाने फरसाण तयार करण्याचा व्यवसाय आहे. 16 डिसेंबर रोजी ते बेपत्ता असल्याची तक्रार महाळुंगे पोलिसात देण्यात आली होती.या प्रकरणाचा तपास करत असताना धनंजय बनसोडे यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूर येथील महिलेशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास केला असता बनसोडे यांच्या मुलांना हे कळल्यानंतर त्यांच्या घरात या विषयावरून वाद सुरू झाल्याचे तसेच आपली मुले घातपात करून आपणाला ठार मारतील अशी भीती त्यांनी आपल्या प्रेमिकेकडे व्यक्त केल्याचे पोलिसांना कळले.
पोलिसांनी बनसोडे यांच्या मुलांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांचा खून करून पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली. अधिक तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *