महावितरणचा लाचखोर अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात

पिंपरी : महावितरणच्या चिंचवड कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. बाबूराव विठोबा हंकारे (वय ५१) असे अटक केलेल्या अतिरिक्त कार्यकारी अभियंताचे नाव आहे.या प्रकरणी एका ३२ वर्षीय व्यक्तीने तक्रार केली आहे.

आरोपीने सोलार पॅनेलचे मीटर बसविण्यासाठी तपासणी अहवाल पाठविण्याकरिता फिर्यादीकडून ४० हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडीअंती ३० हजार रुपये स्वीकारण्यास त्यांनी मान्यता दिली. फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यानी तक्रारीची पडताळणी केली. २४ नोव्हेंबर, २१ डिसेंबर आणि २२ डिसेंबर रोजी सापळा रचला. आरोपी हंकारे ३० हजार रुपये लाच स्वीकारताना चिंचवड येथील महावितरण चाचणी विभाग कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या सापळ्यात अडकले. त्यांना अटक करून शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

आरोपी हंकारे महावितरणच्या चिंचवड येथील चाचणी विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता वर्ग एक या पदावर काम करीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *