‘शास्तीकर’माफी निर्णयाची तातडीने आणि काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी : अजित पवार 

प्रतिनिधी : सुहास मातोंडकर

दि.२२ डिसेंबर २०२२

नागपूर


नागपूर : पिंपरी चिंचवड शहरातील अवैध बांधकामांना शास्तीकरातून माफी देण्याचा निर्णय कोणत्याही शासकीय त्रुटी विरहीत आणि सुस्पष्ट असावा. त्यामुळे नागरिकांना भविष्यात कोणत्याही अडचणी येता कामा नयेत. तसाच हा निर्णय राज्यातील सर्व महापालिकांना लागू करावा अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली.

विधानसभा नियम १०५ अन्वये सादर करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सहभागी होताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांच्या ‘शास्ती’माफीचा प्रश्न सुटणे आवश्यक होते. तो आता सुटला आहे. याच बरोबरीनं राज्यातल्या अन्य शहरांमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांचाही सकारात्मक विचार होणे गरजेचे आहे. महापालिकेत समाविष्ट होण्यापूर्वी गावांमध्ये असलेल्या बांधकामांना अवैध ठरवण्यात आलं. या गावांसाठीही ‘शास्ती’माफीचा निर्णय होऊन तिथे सोयीसुविधा वेगाने उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *