लम्पीमुळे आतापर्यंत पुण्यातील 633 पशुधनांचा मृत्यू

०८ डिसेंबर २०२२

पुणे


लम्पी स्किनचा प्रादुर्भाव पुणे जिल्ह्यात काहीसा कमी होताना दिसत आहे. परंतु, आत्तापर्यंत लम्पीने 633 पशुधनांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील मृत्युसंख्या ही राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. सर्वाधिक बुलडाणा जिल्ह्यात 4 हजार 510 पशुधनांचा मृत्यू झाला आहे. सध्या 611 बाधित जनावरांवर उपचार सुरू असून, त्यापैकी 38 जनावरे गंभीर आहेत. पुण्यात प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले.

त्याचबरोबर विविध पशुधनाच्या संबंधित संस्थांची मदत महत्त्वाची ठरल्याचे सांगण्यात आले. राज्यात तीन लाख 54 हजार 247 पशुधनांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी दोन लाख 71 हजार 465 पशुधन उपचाराने बरे झाले आहेत. त्यापैकी 24 हजार 767 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. राज्यात नुकसान भरपाईपोटी 29 कोटी 94 लाख रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. एक कोटी 39 लाख 47 हजार पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात सर्वाधिक पशुधन हे नगर जिल्ह्यात, तर दुसऱ्या क्रमांकावर पुणे जिल्ह्यात आहे.

यासंदर्भात पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की पुणे जिल्ह्यात लम्पी रोगाचा संसर्ग सुरू झाल्याने जलदगतीने लसीकरण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी सरकारी वाहने उपलब्ध करून देण्यात आली. सुमारे दीड लाखांहून अधिक लशींची खरेदीही करण्यात आली. तसेच, सध्या पुणे जिल्ह्यात 633 जनावरे बाधित असून, त्यातील 38 जनावरे चिंताजनक आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 633 पशुधनाचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक कमी मृत्यू पुणे जिल्ह्यात झाले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *