महाराष्ट्राविरोधात गेल्या दहा दिवसांपासून षडयंत्र रचलं जातंय; सीमावादावरुन सुप्रिया सुळे लोकसभेत आक्रमक

०७ डिसेंबर २०२२


मागील काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सुरू असलेल्या वक्तव्याचे पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेवर हल्लाबोल केला.

सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत म्हटले की, मागील दहा दिवसांपासून महाराष्ट्रात वेगळा मुद्दा चर्चेला येत आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून बेताल वक्तव्य करण्यात येत आहे. महाराष्ट्रच्या नागरिकांना बेळगावच्या सीमेवर मारहाण करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या नागरिकांना झालेल्या मारहाण सहन करणार नाही. महाराष्ट्राविरोधात गेल्या दहा दिवसांपासून षडयंत्र रचलं जातंय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली जात आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न हा सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी भाषिकांवर अत्याचार, दडपशाही सुरू असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले. एका राज्याच्या मंत्र्यांना प्रवेश करण्यास मनाई केली जाते. अशी बंदी घालणारे कर्नाटक हे पहिले राज्य आहे. कर्नाटक सरकारकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा धिक्कार करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. विनायक राऊत यांनी लोकसभेत हा मुद्दा मराठीत उपस्थित केला. महाराष्ट्राच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत गदारोळ झाला.

महाराष्ट्राच्या खासदारांनी लोकसभेत कर्नाटक सरकार कृतीबाबत तीव्र भूमिका घेतली. यावेळी कर्नाटकच्या खासदारांनी त्यावर आक्षेप घेत गदारोळ केला. महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या विरोधक अडचणीत आल्यावर हा मुद्दा उचलला जात असल्याचा दावा कर्नाटकच्या खासदारांनी केला. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने संसदेच्या कामकाजातून काढण्याचे आदेश लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *