१७ डिसेंबरला महाविकास आघाडीचा मुंबईत महामोर्चा – उद्धव ठाकरे

०६ डिसेंबर २०२२


छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त विधाने करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि सीमाप्रश्नी मवाळ धोरण स्वीकारल्याने राज्य सरकारविरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या मुद्दयांवर १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली.

विधिमंडळाचे आगामी अधिवेशन, राज्यपालांकडून सातत्याने केली जाणारी वादग्रस्त वक्तव्ये, महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये होऊ लागलेले उद्योगांचे स्थलांतर, नव्याने तापू लागलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न इत्यादी विषयांवर चर्चा करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीला उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संजय राऊत, आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते.

बैठकीनंतर घेण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकार आणि राज्यपालांना लक्ष्य केले. ‘‘राज्यपाल हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा सातत्याने अवमान करीत आहेत.महाराष्ट्राचा अवमान करीत आहेत, इतकेच नव्हे तर ते हिंदूमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मग, केवळ ते राज्यपाल आहेत म्हणून त्यांचा मान राखायचा का, असा सवाल ठाकरे यांनी केला. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार चांगले चालले असताना गद्दारी आणि कटकारस्थान करून ते पाडण्यात आले. महाराष्ट्रात कुटिलतेची बीजे पेरली जात आहेत. एकसंध महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातील गावांवर आक्रमकपणे हक्क सांगत आहेत, तेव्हा आपल्या राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडतो. आधी जाहीर केलेला कर्नाटकचा दौरा मंत्री रद्द करतात. असले नेभळट सरकार महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते,’’ असा घणाघाती हल्ला ठाकरे यांनी भाजप व शिंदे-फडणवीस सरकारवर चढवला.

गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात आले. आता पुढे काही महिन्यांत कर्नाटकमध्ये निवडणुका होणार आहेत, त्याआधी महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील गावे त्यांना तोडायची आहेत, असा आरोपही ठाकरे यांनी भाजपवर केला. या सर्व प्रश्नांवर महाराष्ट्राची एकजूट दाखविण्यासाठी येत्या १७ डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीने भायखळा येथील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा विराट मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांनी केली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *