आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे आम्ही संजय राऊतांना पाच महिन्यांपूर्वीच दाखवलेलं आहे – शंभूराज देसाई

०५ डिसेंबर २०२२


महाराष्ट्र -कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, हा सीमावाद चिघळू नये म्हणून मंत्र्यांना बेळगावात न पाठवण्याची विनंती मुख्यमंत्री बोम्मई यांनी केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाटील आणि देसाई यांना बेळगावात न जाण्याची सूचना केल्याने हा दौरा रद्द झाल्याचे समोर येत आहे. यावरून संजय राऊत यांनी शिंदे-भाजपा सरकारवर सडकून टीका केली आहे. तर संजय राऊतांच्या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्यामध्ये काय हिंमत आहे हे संजय राऊतांना किमान आम्ही बाळासाहेबांची जी शिवसेना आहे, तिने पाच महिन्यांपूर्वीच त्यांना दाखवलेलं आहे. आमची हिंमत काय आहे?, आमच्यात काय धमक आहे?, याचा संजय राऊतांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे आमच्याबाबत त्यांनी ते बोलू नये.

भाजपा व शिवसेनेचं जे सरकार महाराष्ट्रात आहे, हे सरकार महाराष्ट्रातील मराठी भाषिकांची, सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेणे, महाराष्ट्राकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत. याच्याबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही तिथे जात आहोत. त्यामुळे कोणात धमक आहे आणि कोणामध्ये धमक नाही हे नुसतं बोलण्यापेक्षा संजय राऊतांना माझं एवढंच सांगणं आहे, की जे तुमच्या काळात २०२० पासून सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांच्या सवलती, त्यांना राज्याकडून केली जाणारी मदत थांबली होती, ती शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर तत्काळ सुरू झालेली आहे. तुम्ही केवळ बोलता आम्ही करून दाखवतो.” असंही मंत्री शंभूराज देसाईंनी यावेळी म्हटलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *