पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या ११ महिन्यांत गोवरचे ३०६ संशयित रुग्ण

०५ डिसेंबर २०२२

पिंपरी


पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गेल्या ११ महिन्यांत गोवरचे ३०६ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यातील आतापर्यंत एकूण ८ जणांना लागण झालेली आहे. गेल्या चार वर्षांचा तुलनात्मक आढावा घेतला असता यंदा गोवर रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईमध्ये गोवरची साथ आल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरामध्ये गोवरचे ८ संशयित रुग्ण आढळले. त्यापैकी ५ रुग्णांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कुदळवाडी परिसरात प्रामुख्याने हे रुग्ण आढळले आहे. नव्याने आढळलेले ५ रुग्ण आणि यापूर्वीचे ३ अशा एकूण ८ रुग्णांना गेल्या ११ महिन्यांत गोवरची लागण झाली आहे.

गोवरची साथ लक्षात घेता महापालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने आत्तापर्यंत एकूण १ लाख ३० हजार ५५१ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. ४ लाख ८२ हजार ८१८ इतक्या लोकसंख्येचे त्यामध्ये सर्वेक्षण झाले आहे. ५ वर्षाखालील २८ हजार २९७ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. तर, १५ हजार ३३२ बालकांना व्हिटॅमिन एची मात्रा देण्यात आली आहे. २ हजार १६३ बालकांना गोवर रुबेला पहिला व दुसरा डोस दिला आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.पवन साळवे यांनी दिली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *