फ्लॅट देण्याच्या नावाखाली ३५ जणांची फसवणूक

१९ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


फ्लॅट देण्याच्या नावाखाली ३५ जणांकडून चार कोटी २७ लाख रुपये घेतले. मात्र, नंतर फ्लॅट न देता फसवणूक करून पसार झालेल्या बांधकाम व्यावसायिकाला दोन वर्षानंतर जेरबंद करण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाला यश आले. प्रतीक ओमप्रकाश आगरवाल (रा. बाणेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आगरवाल याच्यासह किरण कुंभारकर, विनय बोरीकर (दोघेही रा. हिंजवडी) यांनी फ्लॅट विकत देण्यासाठी मनदिरसिंग तीर्थसिंग आनंद (रा. औंध) यांच्यासह इतर ३४ ग्राहकांचा विश्वास संपादन केला. यासाठी मार्च २०१८ मध्ये रजिस्टर खरेदीखत करून देतो, असे सांगून त्यांच्याकडून चार कोटी १४ लाख २७ हजार ४९१ रुपये घेतले. मात्र, नंतर फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुख्य आरोपी असलेल्या प्रतीक याचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला असतानाही तो हजर न होता दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.

तपासादरम्यान तो रांची, हैदराबाद या परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. तांत्रिक विश्लेषणावरून तपास केला असता रेल्वे प्रवासात असताना रेल्वे पोलिसांच्या मदतीने त्याला नागपूर येथे रेल्वेतून ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *