वास्तव्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर ठरण्यासाठी महापालिकेची अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सक्ती

१६ नोव्हेंबर २०२२

पुणे


वास्तव्यासाठी देशातील सर्वोत्तम शहर (इज ऑफ लिव्हिंग) ठरविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सकारात्मक अभिप्राय देणे आवश्यक असताना हा निकष पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने चक्क महापालिकेच्या अठरा हजार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकारात्मक अभिप्राय देणे सक्तीचे केले आहे. महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सकारात्मक अभिप्राय देण्याची सक्ती केल्याने नकारात्मक अभिप्राय येण्याची शक्यता असून केवळ सक्तीने अभिप्राय घेऊन क्रमांक मिळविणारे शहर वास्तव्यासाठी सर्वोत्तम ठरेल का, असा प्रश्न उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाकडून वास्तव्यास सर्वोत्तम शहर (इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) अंतर्गत शहर सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याबाबतचे निकष जाहीर करण्यात आले असून नागरिकांच्या दृष्टीने शहर कसे आहे, हा एक प्रमुख निकष आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून शहरातील जीवनमानाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांचे मत विचारात घेतले जाणार आहे. शहराला सन २०१८ मध्ये देशपातळीवर प्रथम क्रमांकाचे आणि २०१९ मध्ये दुसरा क्रमांक प्राप्त झाला होता. त्याअनुषंगाने वास्तव्यास सर्वोत्तम शहर म्हणून पुनश्च: प्रथम क्रमांक प्राप्त होण्यासाठी महापालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली असून त्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना अभिप्राय देणे सक्तीचे करण्यात आले आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून तसे आदेश काढण्यात आले आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *