२९ नोव्हेंबरला पुन्हा लॉन्च होणार ‘ट्विटर ब्लू’ सेवा

१६ नोव्हेंबर २०२२


बनावट खात्यांमुळे स्थगित करण्यात आलेली ‘ट्विटर ब्लू’ सेवा येत्या २९ नोव्हेंबरला पुन्हा लॉन्च केली जाणार आहे. ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी ही माहिती दिली आहे. ही सेवा स्थगित झाल्यानंतर आठवड्याभरात पुन्हा कार्यान्वित करण्यात येईल, असे मस्क यांनी सांगितले होते. मात्र, आता या सेवेसाठी युजर्संना महिना अखेरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

आठ डॉलर्स सबस्क्रिप्शनची ‘ब्लू टिक’ सेवा दोन आठवड्यांपूर्वी ट्विटरनं सुरू केली होती. मात्र, काही युजर्सने या सेवेचा गैरवापर केल्यानं ही सेवा मागे घेण्याची नामुष्की ट्विटरवर ओढवली आहे. दरम्यान, या सेवेसाठी पैसे न भरणाऱ्या युजर्सचे ‘ब्लू टिक’ काही महिन्यांमध्ये काढून घेतले जातील, असे एलॉन मस्क यांनी एका युजरच्या ट्वीटला उत्तर देताना म्हटलं आहे. त्यामुळे ज्या युजर्सकडे सबस्क्रिप्शन सेवेच्या आधीपासून ‘ब्लू टिक’ आहे, त्यांनाही येत्या काळात पैसे भरावे लागणार आहे.

व्हेरिफाईड खात्याचं नाव बदलताना ‘ब्लू टिक’ गमवावी लागू शकते, असेही मस्क यांनी म्हटले आहे. ट्विटरच्या नियमांनुसार नावाची पुष्टी केल्यानंतरच हे नाव बदलता येईल, असंही त्यांनी सांगितले आहे. ट्विटरकडून ‘ब्लू टिक’ पूर्वी राजकारणी, पत्रकार, प्रसिद्ध व्यक्तींच्या व्हेरिफाईड खात्यांना दिली जात होती. मात्र, आता यासाठी सबस्क्रिप्शन सेवा सुरू केल्यानंतर ही टिक कोणालाही वापरता येणं सहज शक्य आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *