रस्त्यालगतच उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर

०८ नोव्हेंबर २०२२

पिपरी


निगडी ते तळवडे या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यालगतच उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. यासह अपघाताचा धोकाही निर्माण होतो. तरीही राजरोसपणे रस्त्यातच वाहने उभी केली जातात.पिंपरी, चिंचवड, भोसरी, चाकण औद्योगिक क्षेत्रासह तळवडे आयटी पार्कला ये-जा करण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे. यामुळे या मार्गावर अवजड वाहनांसह कामगारांची ने-आण करणाऱ्या बसची संख्याही अधिक असते. कंपन्या सुटण्याच्या व भरण्याच्या वेळी वाहतुकीत आणखी भर पडते. अशातच वाहतूक नियमांचे पालन न केल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताच्या घटनाही घडतात.

मोठी वाहने रस्त्यात तसेच रस्त्यालगत कुठेही उभी केली जातात. तळवडे चौक, गणेशनगर चौक, ज्योतिबा मंदिर समोर, टॉवर लाइनकडे जाणारा रस्ता, त्रिवेणीनगर चौक, दुर्गानगर चौक आदी ठिकाणी हे चित्र रोज पाहायला मिळते. अगोदरच अरुंद व खराब रस्ता यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते. दरम्यान, एखादे वाहन कुठेही रस्त्यात उभे केल्याने कोंडीत भर पडते. अनेकजण खरेदी अथवा हॉटेलमध्ये जाताना बिनधास्तपणे रस्त्यातच बेशिस्तरित्या वाहन उभे करून जातात. मात्र, एका वाहनांमुळे लांबपर्यंत रांगा लागतात. अशा बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *