एकनाथ शिंदेंनी कमालच केली! थेट ‘उद्धव ठाकरे गट’ करुन टाकलं

अतुल परदेशी
मुख्य संपादक
०६ ऑगस्ट २०२२


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख टाळला होता, आता एक पाऊल पुढे जात पक्षाला ‘उद्धव ठाकरे गट’ करुन टाकलं. ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर करताना स्वतःच्या शिंदे गटाला त्यांनी शिवसेना असं संबोधलं, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ‘उद्धव ठाकरे गट’ म्हणून डिवचलं. त्यामुळे ही लढाई आणखी किती लांबवर जाणार, हे सांगता येणं कठीण आहे.राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला आहे. शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना-भाजपा युतीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारराजाचेही अभिनंदन व आभार, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीटमध्ये एक पोस्टरही शेअर केलं आहे. या पोस्टरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे फोटो आहेत. राज्यातील २७१ ग्रामपंचायतींच्या निकालाची आकडेवारी देताना एकनाथ शिंदेंनी भाजपाला ८२, शिवसेना ४०, उद्धव ठाकरे गट २७, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस २२ आणि इतरांना ४७ ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाल्याचं म्हटलं आहे.याआधी, उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ असा न करता ‘महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री’ असा केला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करत परस्पर नवी जाहीर केली. त्याचप्रमाणे धनुष्यबाण या निवडणूक चिन्हासह शिवसेनेवर दावा सांगण्याचा प्रयत्नही शिंदेंनी केला आहे. या पार्श्वभूमीवर शिंदेंनी ठाकरेंचा ‘शिवसेना पक्षप्रमुख’ हा उल्लेख टाळणंं अपेक्षितच होतं.