‘योद्धा@८०’ शॉर्टफिल्म स्पर्धेचा अंतिम निकाल जाहिर !

पुणे येथील आकाश मनोहर फुके यांच्या ‘तेव्हाही आणि आजही’ या शॉर्टफिल्मला प्रथम पारितोषिक !

रोहित खर्गे, विभागीय संपादक

मुंबई दि.११ डिसेंबर – राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने देशाचे नेते पद्मविभूषण आदरणीय खासदार शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त ‘योद्धा@८०’ शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत पुणे येथील आकाश मनोहर फुके यांच्या ‘तेव्हाही आणि आजही’ या शॉर्टफिल्मला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.

दरम्यान या स्पर्धेत राज्यभरातून तीनशेहून अधिक संघांनी सहभाग नोंदविला आहे.

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्यावतीने राज्यभरात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. ही शॉर्टफिल्म स्पर्धा आदरणीय पवार साहेबांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीची माहिती लघुपटाच्या अथवा माहितीपटाच्या माध्यमातून तरूण पिढीपर्यंत पोहोचावी व फिल्म मेकिंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या युवक-युवतींकडून साहेबांच्या कारकिर्दीवर चांगल्या कलाकृतींची निर्मिती व्हावी, हा या स्पर्धेच्या आयोजनामागील उद्देश होता.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक पुणे येथील आकाश मनोहर फुके यांच्या ‘तेव्हाही आणि आजही’ या शॉर्टफिल्मला मिळाला आहे तर द्वितीय पारितोषिक बीड येथील कल्याणी राजेश शिंदे यांच्या ‘पंख’ या शॉर्टफिल्मला आणि तृतीय पुरस्कार डोंबिवली येथील सात्विक ए. वेलसकर यांच्या ‘दोस्त’ या शॉर्टफिल्मला मिळाला आहे. प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये १ लाख, करंडक, प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप असून, द्वितीय क्रमांकासाठी ७५ हजार रोख रुपये, करंडक, प्रमाणपत्र, तर तृतीय क्रमांकासाठी ५० हजार रोख रुपये, करंडक व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरूप आहे.

या व्यतिरिक्त विशेष पुरस्कारही जाहिर करण्यात आले असून या स्पर्धेच्या अंतिम ज्युरी कमिटीमध्ये प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक अशोक राणे व प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अतुल परचुरे यांचा समावेश होता.

विशेष पुरस्कारामध्ये विदर्भ विभागातून अमरावती येथील अभिजीत बाबाराव साबळे यांच्या ‘एक निर्णय’ या फिल्मला, मराठवाडा विभागातून (विभागून) परभणी येथील डॉ. गणेश मदनराव शिंदे यांच्या ‘अजूनही चालतो वाट पुरोगामी विचारांची’ व औरंगाबाद येथील आकाश पंडित वाहटुळे, मंगेश लोखंडे यांच्या ‘जाणता राजा’, कोकण विभागातून रत्नागिरी येथील दिलीप आंब्रे यांच्या ‘बक्षिस’, उत्तर महाराष्ट्र विभागातून अहमदनगर येथील हर्षवर्धन एम. वैराळ, अभिषेक ए. शिंदे यांच्या ‘वन डिसिजन’, पश्चिम महाराष्ट्रातून पुणे येथील विनोद गोपाल दुसाने यांच्या ‘हिरो फक्त सिनेमात नसतात’ तर मुंबई विभागातून ठाणे येथील प्रमोद पवार यांच्या ‘समग्र दर्शन : शरद पवार’ या फिल्मला विशेष पुरस्कार मिळाले आहेत.

तर एलजीबीटी विभागात सातारा येथील अभयसिंह काळभोर यांच्या ‘पैलवान’ या फिल्मला,महिला दिग्दर्शकांमध्ये कोकण विभागात रायगड येथील राधिका संजय गुंजाळ यांच्या ‘संधी’ या फिल्मला, पश्चिम महाराष्ट्र विभागात पुणे येथील स्वाती राऊत क्षिरसागर यांच्या ‘सॅल्यूट’ या फिल्मला,मराठवाडा विभागातून हेमा पिंपळे यांच्या ‘गाव माझे सांगाती !’ व मुंबई विभागातून ठाणे येथील पूजा जयवंत मिठबावकर यांच्या ‘बाप’ या फिल्मला मिळाला आहे. माहितीपटासाठी मुंबई येथील सोनाली शिंदे यांच्या ‘आईने घडविलेला बापमाणूस’ तसेच मुंबई येथील डॉ. सौ. सुरैना नीलेश मल्होत्रा यांच्या ‘द्रष्टा’ व औरंगाबाद येथील योगेश पोपटराव सारंगधर यांच्या ‘कृषी क्षेत्रातील योगदान’ या फिल्मना माहितीपट विभागात विशेष पुरस्कार मिळाले आहेत.सर्व विशेष पुरस्कारांचे स्वरूप हे रुपये दहा हजार रोख,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे.

यातील प्रथम परितोषिकाचे वितरण १२ डिसेंबर रोजी आदरणीय शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मुंबई येथील विशेष कार्यक्रमात करण्यात येणार आहे,तर उर्वरित सर्व बक्षिसांचे वितरण मुंबई येथे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत याशिवाय ‘सुप्रिया सुळे एनसीपी’ युट्युब चॅनेल वर सर्व अपलोड करण्यात आलेल्या फिल्म्सपैकी सर्वात जास्त लाईक्स मिळविणाऱ्या प्रथम तीन फिल्मनादेखील बक्षिसे जाहीर करण्यात येणार आहे,ती २२ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल,दिनांक २० डिसेंबर २०२० पर्यंतचे युट्युब चॅनेलवरील फिल्मला मिळालेले लाईक याकरिता ग्राह्य धरले जातील.

सर्व विजेत्या व सहभागी कलावंतांचे ट्रस्टचे विश्वस्त आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार,अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक,अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे,माजी आमदार हेमंत टकले यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *