पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१९ ऑक्टोबर २०२२


पुण्यात झालेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी तुंबलं. अनेक ठिकाणी नागरिकांच्या घर, दुकानांमध्ये पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं. वाहनांमध्ये पाणी शिरल्याने वाहनांचंही नुकसान झालं. त्यामुळे महानगरपालिकेत सत्ता असणाऱ्या भाजपावर जोरदार टीका होतेय. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पाऊस किती पडावा हे महापालिका ठरवत नाही, पण जो पाऊस पडला त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे. काल पुण्यात पडलेल्या पावसाने मागील १० वर्षांचा विक्रम मोडला आहे. इतका पाऊस पडल्यानंतर पाणी तुंबणारच आहे.ड्रेनेज तयार करताना इतक्या पावसाचा विचार केलेला नसतो. भाजपाची सत्ता पाच वर्षांपूर्वी आली, हे ड्रेनेजचे डिझाईन भाजपाने तयार केलेले नाही. हे ड्रेनेज ४० वर्षांपूर्वी तयार केलेले आहेत. आता ही परिस्थिती पाहिल्यानंतर ड्रेनेज लवकर तयार झाले पाहिजेत यासाठी पुणे मनपा निश्चितपणे प्रयत्न करेल. तसेच तशाप्रकारचं डिझाईनही तयार करेल असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *