स्वेच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडावा ही योजना मागे घ्या

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
०२ सप्टेंबर २०२२

आंबेगाव


गेल्या काही दिवसात तालुक्यातील,विविध रेशन दुकानातून अंत्योदय किंवा प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर आवाहन केले जात असून,ज्यांचे “ उच्च उत्पन्न ” आहे अशा नागरिकांनी, अन्नधान्याचा लाभ सोडावा ” अशा सूचना देऊन,अशा स्वरूपाचे अर्ज, रेशन दुकानदारांकडे भरून देण्यासाठी वितरीत केले जात आहेत. तसेच यावेळी “आज पर्यंत घेतलेल्या धान्याची बाजारभावाने वसुली करण्यात येईल आणि शासनाची फसवणूक केल्याबद्दल कार्यवाही केली जाईल ” असे देखील बजावण्यात आले आहे.

प्रशासनाने अशा प्रकारची अंमलबजावणी करण्याचा निर्णय हा २०१६ मध्ये भाजपा युती सरकारने काढलेल्या शासकीय आदेशानुसार घेतला आहे. त्या आदेशाला यापूर्वीच विरोध झाल्यामुळे त्याची अंमलबजावणी होत नव्हती परंतु आता पुणे विभागातील ५ जिल्ह्यांसाठी त्याचे पुनरुज्जीवन प्रशासनाने केलेले आहे. तथापि या आदेशामुळे सामान्य, गोरगरीब कष्टकरी समाजात गैरसमज पसरले आहेत. दुसरीकडे ‘स्वेच्छा’ या शब्दाकडे दुर्लक्ष करून,अनेक ठिकाणी काही चुकीची माहिती देवून फॉर्म भरून घेत असल्याचे दिसून येते.

किसान सभा, आंबेगाव तालुका समितीची मागणी

“बलशाली भारत” बनवण्यासाठी स्वस्त रेशनचा त्याग करावा अशी,जी भूमिका मांडली आहे,तिचा आधार काय आहे, हे ही प्रशासनाने जाहीर करावे अशी मागणी किसान सभेच्या आंबेगाव तालुका समितीने, श्री.ए. बी.गवारी,नायब तहसीलदार,आंबेगाव तालुका यांच्याकडे केलेली आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त धान्य मिळण्यास पात्र ठरण्यासाठी शासनाने जी वार्षिक उत्पन्नाची अट (ग्रामीण भागासाठी रु ४४००० आणि शहरी भागासाठी रु ५९०००) घातली आहे,तीच मुळातून चुकीची, अवास्तव आणि अन्यायकारक असून बहुतांशी कष्टकरी आणि गरीब कुटुंब अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मिळत असलेल्या स्वस्त धान्यापासून वंचित आहेत.

विशेतः कोव्हीड नंतरची वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन,ही वार्षिक उत्पन्न मर्यादा काढून टाकून,केवळ आयकर भरणाऱ्यांना वगळून इतर सर्व कुटुंबाना स्वस्त धान्याचा लाभ द्यायला हवा अशी संघटनेने मागणी केली आहे. याचबरोबर रेशन खराब आले किंवा मिळाले नाही तर याची तक्रार देणारा टोल फ्री नंबर हा अधिकाधिक लोकांना कसा माहित होईल याविषयी प्रयत्न व्हावेत.व लोकांना रेशन विषयी काही तक्रार असेल तर ती देण्यासाठीचे विविध मार्ग उपलब्ध असावेत.व चांगल्या दर्जाचे धान्य रेशनवर मिळावी अशी मागणी या निवेनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. आंबेगाव तालुका किसान सभा समितीचे पदाधिकारी,नंदा मोरमारे,सुभाष भोकटे पुंडलिक असवले दत्ता गिरंगे,रामदास लोहकरे,बाळू काठे यांनी ही मागणी सदरील निवेदनातून केली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *