मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला जीवदान; डॉ. शुभांगी कांबळे, सुर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे यश

दि. २०/०१/२०२३

पिंपरी

 

पिंपरी : गर्भावस्थेच्या जेमतेम साडेपाच महिन्यात जन्म झालेल्या आणि अवघे 400 ग्रॅम वजन असलेल्या अशा नवजात अर्भकाला डॉ. शुभांगी कांबळे आणि सुर्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जीवनदान दिले आहे. रुग्णालयातील 94 दिवसांच्या उपचारानंतर बाळाचे वजन 400 ग्रॅमवरुन दोन हजार 130 ग्रॅमपर्यंत वाढले आहे. त्यानंतर बाळाला घरी सोडण्यात आले. आता बाळ आठ महिन्याचे झाले असून सुखरुप आहे. त्यामुळे बाळाचे आई-वडिल आनंदात आहेत.

याबाबतची माहिती प्रसुती तज्ज्ञ  डॉ. शुभांगी कांबळे यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बाळाचे वडील शशिकांत पवार, आई उज्वला पवार, डॉ. बोरा आदी उपस्थित होते. याबाबतची माहिती देताना साईकृपा हॉस्पिटलच्या प्रसुती तज्ज्ञ डॉ. शुभांगी कांबळे म्हणाल्या, उज्वला पवार या गेल्यावर्षी मे महिन्यात प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांच्या युट्रसला एक लहान आणि एक मोठा असे दोन भाग आहेत. लहान भागात गर्भधारणा झाली होती. या गर्भधारणेत फारतर 6 महिने प्रसुती पुढे जाण्याची शक्यता दिसत होती.  त्यामुळे गर्भधारणेच्या तिस-या महिन्यातच रुग्णाला जास्त त्रास होत होता. त्यामुळे मार्च महिन्यातच पिशवीचे तोंड बंद केले होते. त्यावेळी चौथा महिना सुरु होता. सहाव्या महिन्यापर्यंत रुग्णाला तीनवेळा रुग्णालयात दाखल व्हावे लागले. शेवटच्यावेळी रुग्णालयात दाखल केले, त्यावेळी रुग्णाला जास्त कळा सुरु झाल्या होत्या. त्यावेळी गर्भावस्थेचे फक्त 24 आठवडे झाले होते. सामान्यत: 38 ते 40 आठवड्यांमध्ये प्रसूती होते.

सातव्या महिन्यापर्यंत स्ट्रेच करण्यासाठी यूट्रसला रिलॉक्स करणारे इंजेक्शन दिले. विविध उपचार केले. पण, 24 व्या आठवड्यातच म्हणजे 11 ते 12 आठवडे अगोदर प्रसुती झाली. बाळाचे वजन केवळ 400 ग्रॅम होते. त्यामुळे त्यात मोठी गुंतागुंत होती. बाळाची सुरुवात श्वासापासून झाली. श्वास देण्यासाठी ट्यूब टाकावी लागली. अशा परिस्थिती बाळाला सुर्या हॉस्पिटलमधील नवजात अर्भक विभागात दाखल केले. सुर्या मधील डॉक्टरांनी बाळाला जीवदान देण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. फुफ्फुसे श्वासासाठी खुले करणारी औषधे दिली. बाळाला नाळेतून औषधे आणि पोषक आहार दिला. दीड महिना बाळाने व्हेंटिलेटरवर उपचार घेतले. रुग्णालयातील 94 दिवसांच्या उपचारानंतर मुलीच वजन 400 ग्रॅमवरुन दोन हजार 130 ग्रॅमपर्यंत वाढले आहे. बाळ सुखरुप असल्याचेही डॉ. कांबळे यांनी सांगितले.

बाळाची आई उज्वला पवार म्हणाल्या, गर्भधारणेच्या चौथ्या, पाचव्या महिन्यात त्रास होवू लागल्याने रुग्णालयात दाखल झाले. सहाव्या महिन्यात प्रसूती झाली. डॉ. शुभांगी कांबळे यांनी अतिशय योग्य उपचार केले. आधार दिला. बाळाची जगण्यासाठी मृत्यूशी झुंज सुरु होती. त्याच्या लढाईला आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. आमचे बाळा आता सुखरुप आहे. बाळाला जीवनदान देणा-या डॉक्टरांचे मी मनापासून आभार मानते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *