ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात; प्रशासकीय सेवेचा राजीनामा न स्वीकारल्यानं शिवसेनेच्या नेत्यांची धावाधाव

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१२ ऑक्टोबर २०२२


अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु शासकीय सेवेचा राजीनामा स्वीकारण्यास प्रशासन दिरंगाई करत असल्याने ऋतुजा लटके यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी आहेत. त्यांचा राजीनामा अद्याप महापालिकेकडून मंजूर झाला नसल्याचा पेच आता मविआपुढे आहे.

ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेत प्रशासकीय विभागात कार्यरत आहेत. राजीनामा अर्ज त्वरीत मंजूर करण्यासाठी शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल परब यांच्यासह शिवसेनेच्या इतर नेत्यांची धावाधाव सुरु आहे. महापालिकेच्या काही विभागांची या राजीनामा अर्जाला एनओसी मिळणं अद्याप बाकी आहे. महापालिका नियमानुसार सेवेची किमान 20 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यालाच राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज करता येतो. हा अर्ज तीन महिन्यांच्या कालावधीत कधीही मंजूर केला जाऊ शकतो. परंतु तीन महिन्यांमध्ये यावर कोणताही निर्णय न घेतल्यास आणि संबंधित कर्मचाऱ्याला याबाबत न कळवल्यास त्याचा अर्ज मान्य झाला, असे गृहित धरुन पुढील कार्यवाहीसाठी संबंधित कर्मचारी अर्ज करु शकतो. दरम्यान आज ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होऊन हा पेच सुटण्याची शक्यता आहे. तसे प्रयत्न सुरु असल्याचं महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *