अनिल देशमुखांना खासगी रुग्णालयात उपचार करण्यास न्यायालयाची परवानगी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
११ ऑक्टोबर २०२२


आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना हृदयाला रक्तपुरवठा करणाऱया रक्तवाहिन्यांची तपासणी (अँजिओग्राफी) खासगी रुग्णालयात करण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. गेल्या ११ महिने तुरूंगात असलेल्या देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे. मात्र सीबीआयने दाखल केलेल्या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर झालेला नसल्याने देशमुख अद्यापही कारागृहात आहेत. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर देशमुख यांनी या प्रकरणीही जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर १४ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

आर्थर रोड मध्यवर्ती तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या आजारांशी संबंधित वैद्यकीय अहवाल न्यायालयाला ई-मेलद्वारे पाठवला होता. याबाबत सोमवारी सुनावणी झाली. त्यानंतर न्या. रोकडे यांनी देशमुख यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना दिले. हा सगळा खर्च देशमुख यांच्यातर्फे केला जाईल. देशमुख हे रुग्णालयात असेपर्यंत तेथे आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवला जाईल आणि त्याचा खर्चही देशमुख स्वत: उचलतील, असेही न्यायालयाने देशमुख यांना खासगी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीस परवानगी देताना स्पष्ट केले.अँजिओग्राफी जसलोक रुग्णालयात करण्याची न्यायालयाने परवानगी दिली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *