कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही हे लक्षात ठेवावं – अजित पवार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०८ ऑक्टोबर २०२२


राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाबरोबरच सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये भाषण करताना अजित पवार यांनी शिंदेंच्या बीकेसीमधील दसरा मेळाव्यातील भाषणापासून ते निधी वाटपामधील भेदभावासारख्या विषयावर भाष्य केलं आहे. तसेच कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही असं सांगताना शिंदेंनाही घरी जावं लागेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे.

अजित पवार सत्ता गेली म्हणून ओरडतोय असं वाटेल. पण तसं नाहीय. सत्ता येते, सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हापहापलेले नाही आहोत. जी जबाबदारी जनता देईल ती आम्ही पार पाडू. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिथं भाषण करत असताना सारखं ‘ही लोक बसलेली आहेत ती आपणहून आली आहेत,’ असं मुख्यमंत्री म्हणत होते. अरे निम्मी तर तुमच्या भाषणात निघून गेली. मग कशी आपणहून आली? खुर्चा मोकळ्या झाल्या. आपणहून आलेल्या लोकांनी खुर्च्या मोकळ्या का केल्या?असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले.या मेळाव्यासाठी राज्यातील वेगवगेळ्या भागांमधून लोकांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यामुळे ग्रामीण भागात बसचा तुटवडा जाणवला असंही अजित पवार म्हणाले

मला टीका करायची नाही पण वस्तूस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद मिळत होता,” असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये निधीच्या बाबतीत भेदभाव होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली. “सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला ५० कोटीची कामं दिली तर विरोधी पक्षाच्या आमदाराला २५ कोटीची तरी कामं दिली पाहिजेत. या असल्या गोष्टी कोणी करायला लागलं तर कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही हे लक्षात ठेवावं. एकनाथ शिंदे पण कायमचे तिथे बसायला नाही आले. उद्या १४५ चा आकडा बाजूला गेला तर याही बाबाला घरी जावं लागेल, असंही अजित पवार म्हणाले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *