कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त झालेल्या सोनलकर सरांच्या व्याख्यानाने श्रोते मंत्रमुग्ध

रविंद्र खुडे
विभागीय संपादक
२४ सप्टेंबर २०२२

शिरूर


रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक की ज्यांना रयतेने कर्मवीर ही उपाधी बहाल केली होती, त्यांची २२ सप्टेंबर रोजी जयंती ही सर्वत्रच मोठ्या उत्साहात साजरी होत असते. त्यांनी गोरगरिबांसाठी सुरू केलेल्या शिक्षण संस्थेमध्ये, हा जयंती उत्सव फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या या शिक्षण संस्थेच्या विविध शाखांमध्ये, कर्मविरांच्या जयंतीनिमित्त जवळजवळ महिनाभर विविध स्पर्धा घेऊन, त्यांच्या जिवनपटावरील व्याख्यानांचे आयोजन केले जाते. जगभर कर्मवीर डॉ. भाऊराव पायगोंडा पाटील (अण्णा) यांचे करोडो अनुयायी आहेत. त्यामुळे जगभर त्यांची जयंती साजरी होत असते.


त्याच पार्श्वभूमीवर, शिरूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्येही विविध स्पर्धा घेण्यात आल्या. गुरुवार दि. २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची शालेय विद्यार्थ्यांनी सवाद्य मिरवणूक काढली. त्यात झांज पथक, लेझिम पथक, वृक्षदींडी, ग्रंथदिंडी, विविध वेशभूषा विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. यावेळी शिरूर नगर परिषदेच्या जुन्या इमारतीमध्ये असणाऱ्या कर्मवीर अण्णांच्या पुतळ्यास, समस्त शिरूरकरांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. तर मुख्य कार्यक्रम शुक्रवार दि. २३ सप्टेंबर २०२२ रोजी शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पार पडला. या कार्यक्रमावेळी संस्थेच्या भिगवण शाखेतील शिक्षक, की ज्यांनी कर्मवीर अण्णांच्या कार्यावर पी एच डी मिळविलेली आहे, असे काशिनाथ सोनलकर सरांचे व्याख्यान झाले. ज्यात अण्णांच्या विविध गोष्टींवर बारकाईने कटाक्ष टाकला गेला. या व्याख्यानाने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध करून टाकले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व शिरूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण हे होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये शिरूर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा मनीषा गावडे, मराठा सेवा संघाचे नामदेव घावटे, शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. राहुल घावटे, उद्योजक सी पी बोरा, अभय चोरडिया, सुनील बाफना, माजी मुख्याध्यापीका अस्मिता डोंगरे, उप मुख्याध्यापक मनोहर काळे, प्रभारी पर्यवेक्षक कृष्णा जगदाळे, निवृत्त शिक्षक कवितके सर, आपला आवाज चॅनेल चे विभागीय संपादक प्रा रवींद्र खुडे, आदी मान्यवर, पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


प्रमुख वक्ते डॉ काशिनाथ सोनलकर सरांनी सांगितले की, “कर्मवीर अण्णांनी गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेली देशातील पहिली शिक्षण संस्था रयत ही असून, तीची स्थापना शहरातून नाही तर एका खेड्यातून झाली. विज्ञानाची कास धरणाऱ्या कर्मवीर अण्णांनी शाळा व कॉलेज सुरु करताना कधीच मुहूर्त पाहिला नाही. अमावस्येच्या दिवशीही छत्रपती शिवाजी कॉलेज सारख्या कॉलेजची सुरुवात त्यांनी केली. अण्णांनी सुरु केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या आज ७३७ शाखा झालेल्या आहेत. एक छोटेसे लावलेले वडाचे रोपटे आज मोठा वटवृक्ष म्हणून भक्कम उभे आहे. कर्मवीरांनी संस्थेचे बोध चिन्ह देतानाही वटवृक्ष निवडला, की जो कधीच नष्ट होत नाही, तर तो वाढतच जातो. संस्थेचे नाव देतानाही रयतेचे म्हणजेच ज्यांच्यासाठी ती उभरायची होती, त्या लोकांचे नाव म्हणून रयत हे नाव दिले. नाहीतर आजकाल जे संस्था उभारतात ते कुणाची नावे देतात ? हे सर्वांना सर्वश्रुत आहेच. अण्णांनी आपल्या शाखांना नावे देताना स्वतःच्या किंवा कुटुंबीयांच्या नावाचा उभ्या हयातीत कधीच आग्रह धरला नाही. याउलट त्यांनी जवळजवळ सर्वच महापुरुषांची नावे आपल्या विविध शाखांना दिलीत. एकही महापुरुष असा सोडला नाही, की ज्यांचे नाव रयत शिक्षण संस्थेत नाही. अण्णांनी जातीयता नष्ट करण्याचे सर्वात आधी काम आपल्या शिक्षण संस्थेतून केले. त्यांनी रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने बोर्डिंग (वसतिगृह) सुरु करुन, त्यात विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र ठेवण्याचे काम करत, जातीयता व अस्पृश्यता नष्ट करण्याचे काम केले म्हणून मला अण्णा मोठे वाटतात” असे सोनलकर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “अण्णांना दोन अपत्ये होती, एक म्हणजे मुलगा अप्पासाहेब व मुलगी शकुंतला. की ज्यांनी रयत शिक्षण संस्थेेसाठी आपल्या विद्यार्थी दशेतच आर्थिक मदत केली. अप्पासाहेबांना त्या काळात दहा रुपयांची स्कॉलरशिप मिळाली होती. परंतु अण्णांनी त्यांना जवळ बोलावून सांगितले की, एवढ्या पैशांची गरज तुला नाही. गरजेपुरते दोन रुपये तुला ठेव व बाकीचे आठ रुपये संस्थेला दे. यावर आप्पासाहेबांनी अण्णांचा शब्द खाली पडू न देता संस्थेला आठ रुपये देवून टाकले, म्हणून अप्पासाहेब मोठे वाटतात”.


अण्णांनी एके दिवशी मुलगी शकुंतलेच्या हातातील सोन्याच्या वाकड्या झालेल्या बांगड्या पाहिल्या. अण्णा शकुंतलेला म्हणाले की, “शकुंतला तेवढ्या बांगड्या काढून दे, मी त्या सोनाराकडून सरळ करून आणतो. शाकुंतलेला हे माहीत होते की अण्णांना संस्थेसाठी व वसतिगृहासाठी पैसे हवे असतील म्हणूनच अण्णा बांगड्या मागत आहेत. या बांगड्या पुन्हा मिळणार नाहीत हे माहीत असतानाही त्यांनी बांगड्या अण्णांच्या हातात दिल्या, म्हणून शकुंतला मोठ्या वाटतात.” अण्णांच्या धर्मपत्नी यांचा तर त्याग खूप मोठा आहे. त्यांच्या अंगावरील १२० तोळे सोने अण्णांनी कधी गहाण ठेवून तर कधी मोडून रयत शिक्षण संस्थेसाठी वापरले. म्हणून खऱ्या अर्थाने लक्षमिवहिनी मला मोठ्या वाटतात.” “अलीकडेच फेस बुक चे प्रणेते मार्क झुकेनबर्ग यांनी, त्यांच्या पत्नीला वाढदिवसानिमित्त एक कोरा धनादेश देवू केला व त्यावर हवी तेवढी रक्कम टाकण्यास सांगितले. त्यावर त्यांच्या पत्नीने काही कोटींची रक्कम टाकून एक अट घातली, ती म्हणजे त्या रक्कमेचा वापर त्या स्वतःसाठी करणार नसून, गरीब व गरजू विद्यार्थिनींसाठी करणार असल्याचे सांगताच, मार्क यांनी पत्नीला विचारले की एवढी मोठी प्रेरणा तुला कुठून मिळाली ? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांच्या पत्नींनी दोन नावे घेतली, ती म्हणजे भारतातील थोर शिक्षण महर्षी कर्मवीर डॉ भाऊराव पाटील (अण्णा) व त्यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई यांचे. म्हणून कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाई मोठ्या आहेत.” काशिनाथ सोनालकरांनी त्यांच्या शैलीत सादर केलेल्या या व्याख्यानाला कधी हसून तर कधी रडून श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात साथ दिली. सोनलकर सरांनी आपल्या व्याख्यानात सांगितले की, “रयत शिक्षण संस्थेचा गोतावळा एवढा मोठा आहे, की तो स्वीडन या देशाच्या एक कोटी लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे. संस्थेचे एके काळचे आर्थिक बजेट हे गोवा राज्याच्या आर्थिक बजेट एवढे होते. आणि म्हणूनच रयत शिक्षण संस्था ही खूप मोठी व तिला साथ देणारेही खूप मोठे आहेत.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र देशपांडे यांनी केले. अहवाल वाचन बाळासाहेब गिरीगोसावी यांनी केले, सूत्रसंचालन के एस थिटे मॅडम यांनी केले, तर आभार एस डी शिंदे मॅडम यांनी मानले. यावेळी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. त्याचे सूत्रसंचालन आर बी रोहिले सर व माधुरी बरुडे मॅडम यांनी केले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *