न्यायदेवतेचे आम्ही मनापासून आभारी आहोत, सत्याचा विजय न्यायालयात झालेला आहे – विनायक राऊत

आपला आवाज न्यूज नेटवर्क
२३ सप्टेंबर २०२२


शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावरून वाद निर्माण झाला होता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचंही महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं. दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटाच्या याचिकेविरोधात हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने ही याचिका देखील फेटाळली आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर शिवसेना खासदार विनाय राऊत यांनी दिली आहे.

विनायक राऊत म्हणाले, न्यायदेवतेचे आम्ही मनापासून आभारी आहोतच, सत्याचा विजय न्यायालयात झालेला आहे. पहिल्यापासूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे ठामपणे सागंत होते, की आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. दसरा मेळावा शिवतीर्थावरच साजरा करण्यास आम्हाला परवानगी मिळेल, अशी खात्री होती, आत्मविश्वास होता. आज हा आमचा आत्मविश्वास खरा ठरलेला आहे. पुन्हा एकदा मी न्यायदेवतेचे आभार मानतो.

गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी पार्कवर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दसरा मेळावा झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा देखील दसरा मेळावा झाला. परंतु, यावेळी शिंदे गट आणि भाजपकडून शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात हस्तक्षेप करण्यात आला. दसरा मेळाव्यात कुठेतरी खोडा घालायचा, अडथळा निर्माण करायचा यासाठी शिंदे गटाच्या एका आमदाराने याचिका दाखल केली होती. सुदैवाने न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.त्यामुळे यावर्षी देखील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्या विचाराचं सोनं लुटलं जाईल आणि ही आमच्या दृष्टीकोनातून अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे.असंही राऊत यांनी सांगितलं.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *