महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियान पंचायत समिती जुन्नर अंतर्गत बँक कर्ज वाटप मेळावा संपन्न

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
०१ सप्टेंबर २०२२

आळेफाटा


जुन्नर तालुक्यातील ओतूर, पिंपरी पेंढार जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत पिंपरी पेंढार येथे जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व प्रकल्प संचालक शालिनी कडू ( जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद पुणे) यांच्या संकल्पनेतून आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे तसेच शरद माळी (गटविकास अधिकारी पंचायत समिती ,जुन्नर) यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अभियान पंचायत समिती जुन्नर,सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा वडगाव आनंद, रणरागिनी महिला ग्राम संघ पिंपरी पेंढार आणि ग्रामपंचायत पिंपरी पेंढार यांचे संयुक्त विद्यमाने बँक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला. या बँक कर्ज वाटप मेळाव्यात पिंपरी पेंढार येथील १६ समूह आणि वडगाव आनंद येथील ३ समूह अशा एकूण १९ समूहांना ४४ लाख ९० हजार रुपये इतके कर्जवाटप करण्यात आले. हा बँक कर्ज वाटप मेळावा म्हणजे उमेद अभियानातील सर्व महिलांचे उमेदीच्या विकासाच्या दिशेने सकारात्मक पाऊल आहे, या बँक मेळाव्यास जुन्नर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी यांनी भेट दिली. तसेच या बँक कर्ज वाटप मेळाव्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती जुन्नर उषा अभंग, पिंपरी पेंढार गावच्या सरपंच सुरेखा वेठेकर ताई , सेंट्रल बँक ऑफ इंडिया ब्रांच मॅनेजर पाळंदे, असिस्टंट मॅनेजर मोरे, जुन्नर पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट, सुनिता सुवर्णकार, निर्मला गाढवे, ग्रामपंचायत सदस्य, तसेच रणरागिनी ग्राम संघातील सर्व पदाधिकारी आणि उमेद अभियानातील सर्व महिला उपस्थित होत्या.

पिंपरी पेंढार गावामध्ये गेल्या दोन वर्षांपूर्वी उमेद अभियाना अंतर्गत जुन्नर पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक रविंद्र आल्हाट यांचे मार्गदर्शना द्वारे महिला बचत गट सुरू करण्यात आले, या सर्व गटांची नोंदणी उमेद अभियाना मध्ये झालेली आहे. तसेच पिंपरी पेंढार ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ३५ बचत गट स्थापन झाले असून हे सर्व गट उमेद अभियानाच्या दशसूत्री चे पालन करून सुरू आहेत. यापैकी २४ गटांना खेळते भांडवलप्रस्ताव सादर केलेले आहेत, पैकी १५ गटांना खेळते भांडवल प्राप्त झाले आहे,लवकरच शिल्लक गटांना सदर भांडवल प्राप्त होईल ,तसेच यापूर्वी २ गटांना बँक कर्ज प्राप्त झालेले आहे व या कर्जातून या गटांनी कुक्कुटपालन, बंदिस्त शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती, मधुमक्षिका पालन, कृषी अवजार बँक, यांसारखे उपजिवीका उपक्रम केलेले आहेत. उमेद अभियानाच्या माध्यमातून या सर्व महिलांना विकासाच्या दिशेने एक नवी उमेद प्राप्त झाली आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *