बजरंगाची कमाल थेट २५ लाखांची धमाल

कैलास बोडके
बातमी प्रतिनिधी
१५ फेब्रुवारी २०२२

डुंबरवाडी


हल्ली बैलगाडा शर्यत म्हटले की गाडा शौकीन, जगाचा पोशिंदा बळीराजाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय ग्रामीण भागात मानला जातो. शासनाच्या निर्णयानंतर पुन्हा एकदा यात्रा जत्रांमधून घाटात बैलगाडे दवडू लागले आहेत,भंडारा, धुरळा उडवताना आनंदाला भलतेच उधाण आल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे इतकेच नाही तर मावळच्या घाटात सोशल मीडियावर चर्चा आहे ती खेडच्या ७५ वर्ष वयाच्या तरुणाईला लाजवेल अशा प्रकारे घाटात घोडीवर सवारी केलेल्या आजोबांची. त्यानंतर प्रामुख्याने चर्चा आहे ती ओतूर जवळील (डुंबरवाडी ता. जुन्नर ) येथील शेतकरी प्रमोद उर्फ सोन्या दत्तात्रय डुंबरे यांच्या बजरंगनामे बैलाची.

हौसेला मोल नसते असे म्हणतात त्याचे हे ताजे उदाहरण अणे माळशेज मार्गावरील दांगट वाडीचे उद्योजक किशोर दांगट व बंधू बबन दांगट या दोघांनी नुकतीच या बजरंग ची नव्याने खरेदी केली असून तब्बल २५ लाख रुपये मोजले आहेत. म्हणूनच बजरंगाची कमाल तब्बल २५ लाखांची धमाल अशा चर्चेने संपूर्ण जिल्हाभर सोशल मीडियावर जोर धरला आहे. गेली कित्येक वर्षे बैलगाडा शर्यतीवर बंदी होती अनेक बैलगाडा मालक शेतकऱ्यांच्या दावणीला बांधलेले बैल व त्या गाडा मालकांनी पोटच्या पोराप्रमाणे हजारो रुपये खर्च करून व त्यांची जीवापाड काळजी घेऊन संगोपन केलेले आहे.

बैलगाडा शर्यती सुरू झाल्या अन गाड्याच्या रुबाबदार बैलांच्या किंमती ही तितक्याच वेगाने गगनाला भिडल्या. नानोली(ता. मावळ )येथे झालेल्या बैल गाडा शर्यती मध्ये या बजरंग ने कमाल करून दाखवत नंबर वन बारी करून प्रेक्षक गाडा रसिकांना विशेष कमाल दाखवील्याने बैल गाडा शौकीनांच्या मनात घर केले आहे.शर्यती चालू झाल्या पासून अज्ञापपर्यंत बैलांच्या किंमती ११ लाख तर घाटात उत्तम पळणाऱ्या बैलास १५ लाख रुपये मोजायला तयार आहेत. अशातच दांगट बंधूनी बजरंग ची तब्बल २५ लक्ष रुपये देऊन खरेदी करून परिसरातील संपूर्ण गाडा प्रेमींना अवाक केले आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली आहे. याबाबत खरेदीदार दांगट बंधूंशी मोबाईलवर संपर्क केला असता फोन बंद असल्याचे समजले तर बैलमालक विक्रेते डुंबरे यांच्याशी बोलून खात्री केली असता त्यांनी २५ लाखालाच बैल विकल्याचे स्पष्ट केले आहे.मात्र इतक्या मोठ्या रकमेला बैल विकला गेल्याचे पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागातील हे पहिलेच उदाहरण असल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *