औरंगाबादमध्ये जे शिवसेनेतून फुटलेत, त्यांना आम्ही दोघं आडवं करू; खैरे-दानवेंचा हल्लाबोल

अतुल परदेशी
मुख्य संपादक
१४ ऑगस्ट २०२२


एकनाथ शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्याविरोधात आता शिवसेना आक्रमक होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते झालेले शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची भेट घेतली. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगाबादमधील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना फटकारले. अंबादास दानवे आणि मी आता एकत्र काम करायचे ठरवले आहे. मातोश्रीवरून आलेला प्रत्येक आदेश माझ्यासाठी महत्वाचा आहे. आता आम्ही दोघे मिळून औरंगाबादमध्ये शिवसेनेतून जे लोक फुटले आहेत, त्यांना आडवं करू. त्यासाठी आम्ही दोघे काफी आहोत, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले.तसेच अंबादास दानवे हे विरोधी पक्षनेता म्हणून चांगली कामगिरी बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अंबादास दानवे हे प्रचंड अभ्यासू आहेत. ते महाराष्ट्रात फिरून आले आहेत. ते अनेकदा लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचत असतात. त्यामुळे आगामी काळात अंबादास दानवे हे माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा चांगले काम करतील, असा विश्वास चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला. अंबादास दानवे आणि माझ्यात अनेकदा मतभेद झाले. कुटुंबातील अशाप्रकारचे मतभेद होत असतात. हे मतभेद तात्विक होते. पण मतभेद होत असताना आमच्यातील प्रेमही वाढत गेले, असेही चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.अंबादास दानवे यांची नुकतीच विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर शनिवारी अंबादास दानवे यांनी औरंगाबादमधील चंद्रकांत खैरे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. मी खैरे साहेबांचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे. आम्हाला सगळ्यांना मिळून मराठवाडा आणि महाराष्ट्राचं काम करायचे आहे. संघर्ष हा आमच्या पाचवीला पुजलेला आहे. चंद्रकांत खैरे हे आमच्या पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे मी त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी आलो आहे, असे अंबादास दानवे यांनी सांगितले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *