अनधिकृत नळजोड ३१ डिसेंबरपर्यंत नियमित करता येणार, महापालिकेकडून पुन्हा मुदतवाढ

०२ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


शहरातील १५ मिलिमीटर व्यासाचे घरगुती अनधिकृत नळजोड ३१ डिसेंबरपर्यंत नियमित करता येणार आहेत. अवैध नळजोड नियमित करण्यासाठी महापालिकेने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. महापालिकेच्यावतीने अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यात येत आहेत. त्याची मुदत पाणीपुरवठा विभागाकडून ३० जूनवरून ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. यामध्ये नागरिकांना १५ मिलिमीटर व्यासाची घरगुती अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, नागरिकांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या मोहिमेला पाणी पुरवठा विभागाकडून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.

अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी आता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर पालिकेकडून नळजोडांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी विहित अर्जासोबत आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, महापालिकेचे मिळकतकर आकारणी बिल आणि लाइट बिलाच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे. अर्ज जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जमा करावेत, किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *